कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील तासिका तत्त्वावर (सी.एच.बी.) काम करणाऱ्या २२२५ साहाय्यक प्राध्यापकांना गेल्या पाच महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. सध्या मिळणारे मानधन अल्प त्यातच ते मिळण्यास विलंब होत असल्याने ‘सीएचबी’धारकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मानधन हे दर महिन्याला अदा करावे, अशी अपेक्षा ‘सीएचबी’धारकांमधून व्यक्त होत आहे.कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात दोन हजार २२५ साहाय्यक प्राध्यापक तासिका तत्त्वावर काम करीत आहेत. राज्य शासनाने नोव्हेंबर २०१८ मध्ये सीएचबीधारकांच्या मानधनाचे सुधारित दर लागू करण्यात आल्याबाबतचा आदेश काढला. त्यामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान, शिक्षणशास्त्र, शारीरिक शिक्षण आणि विधि शाखेच्या पदवी, पदव्युत्तर, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सैद्धान्तिक आणि प्रात्यक्षिकांसाठी २०० ते ६०० रुपयांपर्यंत प्रतितास मानधन देण्याबाबतचा उल्लेख आहे. या आदेशानुसार नोव्हेंबर ते मार्चपर्यंतचे मानधन मिळणार आहे. एकीकडे सुधारित दरानुसार मानधन मिळणार असल्याचा आनंद असला, तरी दुसरीकडे तब्बल पाच महिन्यांचे मानधन मिळाले नसल्याने या सीएचबीधारकांना आर्थिक चणचण भासत आहे. शासकीय महाविद्यालयातील सीएचबीधारकांना मानधन मिळाले आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास एक महिना राहिला आहे. त्यापूर्वी हे थकीत मानधन लवकर मिळावे, अशी अपेक्षा सीएचबीधारकांकडून व्यक्त केली जात आहे.सुधारित दरानुसार मानधन !दरम्यान, याबाबत कोल्हापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. अजय साळी यांनी सांगितले की, सीएचबीधारकांना जुलै ते आॅक्टोंबरपर्यंतचे मानधन जुन्या दराप्रमाणे अदा केले असून नोव्हेंबर २०१८ ते मार्च २०१९ पर्यंतचे मानधन हे सुधारित दरानुसार दिले जाणार असल्याने विलंब होत आहे. त्याबाबतची कार्यालयाकडून प्रक्रिया सुरू आहे. लवकरच सीएचबीधारकांचे मानधन जमा करण्यात येणार आहे.कोल्हापूर विभागातील आकडेवारीया विभागातील अनुदानित महाविद्यालये : १३०महाविद्यालयांतील साहाय्यक प्राध्यापकांची रिक्त पदे : ११००रिक्त पदांवर काम करणारे ‘सीएचबी‘धारक : २ हजार २२५
‘सीएचबी’धारकांचे पाच महिन्यांचे मानधन थकीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 11:40 PM