कागल : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो, अशी घोषणा करीत सत्तेवर आलेले देवेंद्र्र फडणवीस आता कर्जमाफीवर बोलायला तयार नाहीत. मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल न्यायालयात भूमिकाच मांडत नाहीत. शेतकरी, मराठा, धनगर समाजाची फसवणूक करणारे हे बांडगुळाचे सरकार आहे, अशी घणाघाती टीका विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते आमदार धनंजय मुंडे यांनी केली.सावर्डे बुदु्रक (ता. कागल) येथे राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार के. पी. पाटील, प्रवीणसिंह पाटील, भय्या माने, संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ, गणपतराव फराकटे, राजू लाटकर यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समितीचे उमेदवार, पदाधिकारी प्रमुख उपस्थित होते. मुंडे म्हणाले की, शेतकऱ्यांची कर्जमाफी घेतल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्र्रेस गप्प बसणार नाही. नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा घेतलेला निर्णय म्हणजे शेतकऱ्यांसाठी भीषण दुष्काळ आणणारा निर्णय झाला आहे. यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे २० हजार कोटींचे नुकसान झाले आहे. अजून होत आहे. या भाजपवाल्यांनी काळा पैसा काढतो, असे म्हणत नोटाबंदीला देशप्रेमाचे स्वरूप दिले. मग, आता किती काळा पैसा बाहेर आला, किती बनावट नोटा निघाल्या, याबद्दल मोदी बोलत नाहीत. कारण काळ्या पैसेवाल्यांना नवीन नोटा घरपोच करण्याचे काम यांनी केले आहे. कष्टाने घाम गाळून ज्यांनी पैसे मिळविले त्यांना मात्र त्यांच्याच पैशासाठी रांगेत उभे केले आहे. मतदानाद्वारे शेतकरी सामान्य माणूस हा राग व्यक्त केल्याशिवाय राहणार नाहीत.डॉ. इंद्रजित घाटगे यांनी स्वागत, तर शिवानंद माळी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी शीतल हिरुगडे, प्रकाश पाटील, संदीप पाटील, भय्या माने, प्र्रवीण्सिंह पाटील, आम. के. पी. पाटील यांचीही भाषणे झाली. यावेळी अबीद मुश्रीफ, दिनकर कोतेकर, प्रकाश गाडेकर, बोरवडे जि. प.चे उमेदवार मनोज फराकटे, जयदीप पोवार, अर्चना सुतार, सिद्धनेर्ली जि. प.च्या उमेदवार वृषाली पाटील, दीपाली पाटील, अनिता पाटील, आदींसह विविध कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)वारसाशिवाय दुसरे कोण नाही?आम. धनंजय मुंढे म्हणाले की, बोरवडे येथे मंडलिकांची तिसरी पिढी, सिद्धनेर्लीत घाटगेंची पिढी निवडणुकीसाठी उभी आहे म्हणे. का हो? स्वत:च्या वारसाशिवाय दुसरे कोण नाहीच. कार्यकर्त्यांनी कोठे जायचे? कागलला रक्ताचे नाते निवडणुकीला उभे राहिले तेव्हा आमदार मुश्रीफांनी स्वत:च्या भावजयीच्या विरोधात कार्यकर्त्याला निवडून आणले याला म्हणतात कार्यकर्त्यांवर निष्ठा आणि प्रेम. यावर टाळ्यांचा कडकडाट झाला.अच्छे दिन चेष्टेचा विषय आम. मुंढे यांनी नरेंद्र मोदींच्या भाषणांची खिल्ली उडवत सांगितले की, ‘अच्छे दिन आने वाले है,’ असे म्हणून आता गावागावांत याबद्दल चेष्टा केली जाते. भाजपचेच प्रमुख नेते नितीन गडकरीही म्हणत आहेत की, ‘अच्छे दिनकी हड्डी भाजप के गले मे फंसी है! ना बाहर आती है! ना नीचे जा रही है,’ यावर एकच हशा पिकला.
मराठा, धनगर समाजाची सरकारकडून फसवणूक
By admin | Published: February 18, 2017 12:16 AM