कोल्हापूर : रस्ते विकास प्रकल्पांतर्गत केलेल्या ४९.४९ किलोमीटर रस्त्यांची तांत्रिक तपासणी शनिवारपासून सुरू झाली. रस्त्यांची खुदाई करून त्याखालील साहित्य कशा प्रकारचे आहे, याची तपासणी करून कमी दर्जाच्या रस्त्यांचे नमुने प्रयोगशाळेतील तपासणीसाठी घेण्यात आले. राज्य सरकारने नियुक्त केलेल्या रस्ते मूल्यांकन समितीचे प्रमुख तथा राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक रामचंदाणी यांच्यासह मुख्य अभियंता ओहोळ, कार्यकारी अभियंता शिंदे, उपअभियंता भांबुरे, नगर अभियंता नेत्रदीप सरनोबत, आर्किटेक्टस् असोसिएशनचे राजेंद्र सावंत, सुधीर हांजे, प्रसाद मुजुमदार, नोविल कंपनीचे अमित सणगर, आदींनी ही पाहणी केली.शिवाजी विद्यापीठ ते शाहू टोलनाका, सायबर चौक ते कळंबा फिल्टर हाऊस, संभाजीनगर ते तलवार चौक तसेच फुलेवाडी, आदी रस्त्यांवर एकूण सात ठिकाणी या समिती सदस्यांनी प्रत्यक्ष खुदाई करून रस्त्यांच्या दर्जाची तपासणी केली. त्यासाठी रस्त्यावर तीन बाय तीन फूट लांबी रुंदीची आणि खाली जेथेपर्यंत काम झाले आहे तेथेपर्यंत खुदाई करण्यात आली. करारात नमूद केल्याप्रमाणे माल वापरला आहे किंवा नाही, योग्य जाडीचे थर अंथरले आहेत किंवा नाही, तसेच योग्य दर्जाचा माल वापरला की नाही, याची नोंद घेण्यात आली. तसेच यावेळी खुदाई केलेल्या रस्त्यात वापरलेल्या मालाचे काही नमुनेही घेण्यात आले. सिमेंट कॉँक्रीटच्या रस्त्यांना बऱ्याच ठिकाणी तडे गेले आहेत. त्याचीही कळंबा व फुलेवाडी रस्त्यावर जाऊन पाहणी केली. समितीने सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारींच्या भिंती, रस्त्यावर उभारलेले इलेक्ट्रिक खांब यांचा दर्जा आणि त्यासाठी वापरलेल्या मालाची बारकाईने तपासणी केली. तपासणी अजून दोन दिवस रस्त्याच्या दर्जाच्या तपासणीचे काम आणखी दोन दिवस चालणार आहे. आयआरबीने शहरात ४९.४९ किलो मीटरचे एकूण १३ रस्ते केले आहेत. या सर्व रस्त्यांवर प्रत्येकी दोन ठिकाणी खुदाई करून रस्त्यांच्या कामाचा तांत्रिकदृष्ट्या दर्जा तपासून त्याचा अहवाल तयार केला जाईल आणि रस्त्यांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे, असे राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
‘आयआरबी’च्या रस्त्यांची तपासणी
By admin | Published: June 14, 2015 1:55 AM