कल्याण-भिवंडी लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादीचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांना उमेदवारी जाहिर झाल्याने आज सायंकाळी कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी आणि उद्धवसेनेकडून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी चक्क नृत्य करुन आनंद व्यक्त केला. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते या जल्लोषात सहभागी झाले नव्हते.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वंडार पाटील यांच्यासह माजी नगरसेवक जे. सी. कटारिया, युवा कार्यकर्ता प्रशांत माळी, शिवसेनेचे दत्तात्रय खंडागळे,वंडार कारभारी आदी यावेळी सहभागी झाले होते. ठाकरे गटाच्या शिवसेना शहर शाखेपासून ढाेलताशांच्या गजरात कार्यकर्ते छत्रपती शिवाजी चौकात पोहचले. त्यांनी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करीत जल्लोष साजरा केला. जिल्हाध्यक्ष वंडार पाटील यांनी सांगितले की, महाविकास आघाडीचा उमेदवार कधी घोषित होणार याबाबत आम्हाला उत्सुकता लागून होती.
आज उमेदवार घोषित करण्यात आल्याने आनंद साजरा करीत आहे. समोर भाजपचे उमेदवार कपील पाटील यांचे आव्हान असले तरी महाविकास आघाडीतील तिनही घटक पक्ष एकजूटीने काम करुन सुरेश म्हात्रे यांना विजयी करतील असा विश्वास व्यक्त केला. तसचे या जल्लोषात काँग्रेस सहभागी झाली नाही. काँग्रेसची नाराजी आहे या विषयी विचारणा केली असता पाटील यांनी कोणाचीही नाराजी नसून तिन्ही पक्ष निवडणूकीत दिलेल्या उमेदवाराच्या विजयासाठी काम करतील असे ठामपणे सांगितले.