जोतिबा: संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दख्खनचा राजा श्री जोतिबा च्या मूर्तीवर मंगळवार पासुन सुरु असलेल्या रासायनिक संवर्धन प्रक्रियचे काम पूर्ण झाले. आज, शनिवारी सकाळी जोतिबा देवाच्या मूर्तीची श्रींच्या मुख्य पूजाऱ्यांच्या हस्ते विधीवत प्राण प्रतिष्ठापना करून भाविकांसाठी मुळ मूर्तीचे दर्शन खुले करण्यात आले. चार दिवसानंतर खुल्या झालेल्या जोतिबा देवाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.जोतिबा देवाच्या मूर्तीच्या विधीवत प्राण प्रतिष्ठापनावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्रीक्षेत्र आडी देवस्थानचे परमात्मराज महाराज, आणि प्रमुख उपस्थित म्हणून जिल्हाधिकारी अमोल येडगे, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे उपस्थित होते. जोतिबा मूर्तीवर संवर्धनाचे काम पूर्ण झाल्यानंतर आज शनिवारी सकाळी ७ वाजून ५ मिनिटांच्या शुभ मुहूर्तावर श्रींच्या मुख्य पुजाऱ्यांच्या हस्ते मूर्ती प्राण प्रतिष्ठापणा सोहळा संपन्न झाल्यानंतर मूळ मूतीचे दर्शन भाविकांसाठी खुले केले. यावेळी आरती मंत्रपठन पुष्पवृष्टी करून शंख घंटानाद करण्यात आला. चांगभलंचा गजर करून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. मूळ मूर्तीचे दर्शन चार दिवस बंद ठेवल्याने आज दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली. भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. मंदिरात महिलांनी सामुहिक मंत्रपठन केले. मंदिराच्या सभोवती रांगोळी काढण्यात आली होती. त्यांचबरोबर मंडपाची आकर्षक सजावट करण्यात आली होती.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आडी देवस्थानचे परमात्मराज महाराज प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, जोतिबा हे जागृत देवस्थान असून श्री जोतिबा देवाचे महात्म्य वाढत आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त करून जोतिबा तीर्थ क्षेत्राचा अधिकाधिक विकास व्हावा अशी मनोकामना व्यक्त केली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले की, रासायनिक मूर्ती संवर्धनाचे काम पुरातत्व विभाग, श्रीपुजक आणि जानकार लोकांच्या मार्गदर्शन आणि नियमानुसार झाले असून झालेल्या कामा बदल समाधानी आहे.
Kolhapur: श्री जोतिबाच्या मूर्तीवरील रासायनिक संवर्धन प्रक्रिया पूर्ण, मूर्ती भाविकांना दर्शनासाठी खुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 14:30 IST