‘बेटी बचाव’मध्ये आदिवासी आघाडीवर ! मुलींचा जन्मदर ९८० ते ९९० च्या जवळपास... मुलींचा जन्मदर मुलांपेक्षा अधिक... लक्ष वेधून घेतलेल्या बातमीने मन तीन वर्षे मागे गेले... गेले ते थेट नर्मदामय्या किनारी... शूलपाणीच्या जंगलातल्या लखनगिरी महाराजांच्या आश्रमात. घोंगश्याला होता आमचा मुक्काम. शूलपाणीच्या जंगलातला हा अतिशय दुर्गम-खडतर टप्पा. झोपडीपासून तीसएक पावलं अंतरावर मट्याचं अडवलेलं अथांग पाणी हेलकावंत होतं. त्या पात्रात लहान-मोठ्या होड्या बांधून ठेवल्या होत्या. त्या भागातले दळणवळणाचे ते एकमेव साधन.मी शांतपणे झोपडीबाहेरच्या कट्ट्यावर बसून होते. माझ्या सभोवताली पाच-सहा छोट्या मुली वावरत होत्या. माझ्या कडे टुकू-टुकू पहात होत्या. कोणाच्या अंगावर नुसता बनियन, तर कोणाच्या अंगावर विटका टॉप. एकीच्या अंगावर नुसत्या पिनेवर अडकविलेला ढगळ युनिफॉर्मचा बिनमापाचा पेटीकोट होता कसाबसा अडकवलेला. त्यावर कळकट ओढणी. शेंबडानं वाहणारं नाक. चिपडं भरलेले डोळे, डोक्यावरच्या पिंग्या केसात जटांचं जंगल आणि धुळीचा खकाणा...मी खुणेनेच एकीला जवळ बोलावले. खुदकन हसून जरा लाजत लाजतच ती जवळ आली. मी तेल लावून तिचे केस विंचरुन दिले. तिला तोंड धुवायला लावलं. मग जवळचा आरसा दाखवला, ती खूश होऊन पळाली... मग दुसरी आली, मग तिच्यापाठोपाठ तिसरी प्रत्येकीच्या केसांतून बुचू बुचू उवा खांद्या-पाठीवर सांडत होत्या. माझी ही कसरत कितीतरी वेळ दुरुनच पहाणारे आश्रमव्यवस्थापक नर्मदागिरी मला विचारत आले.‘‘और कितनी तकलीफ उठाओगी? यहाँ एकेक घर में १०-१२ लडकियाँ होती है। हमने कितनी बार समझाया, लेकिन इन लोगोंकी गंदे रहनेकी आदत छुटतीही नही है।’’‘‘ वो देखो, सत्ताईस बच्चे पालनेवाली माँ, खेतोमें काम कर रही है। क्या क्या करेगी वो... चक्की चलाएगी। रोटी बनाएगी, लकडी कंडा बटोरेगी, खेतो में काम करेगी और बच्चे भी पैदा करेगी? कोन किसका खयाल रखेगा। हे सगळं ऐकून माझी बोलतीच बंद झाली आणि हातही थांबले. नर्मदागिरी सांगत होते. या भिल्लांचे रीतीरिवाज नागर समाजातल्या रीतीरिवाजांपेक्षा खूपच वेगळे. इथे ज्याला भरपूर मुली तो खरा धनवान. शहरातली म्हण आहे. पहिली बेटी-तूप रोटी, दुसरी बेटी धनाची पेटी, पण त्यांच्या सगळ्याच बेट्या धनाच्या पेट्या असतात. इथे मुलाचे वडील ‘देज’ म्हणजे हुंडा घेऊन, नवीन कपडे घेऊन मुलींच्या दारात येतात. बोलणी होतात. मग सुपारी फुटते. नाही जमलं तर मुलगी परत बापाच्या घरी येऊ शकते. दुर्गम जंगल भागातल्या या मुली सुदृढ असतात. कामसू असतात. काटकही असतात. सोयी सुविधा, सुधारणा, शिक्षण, विकास या सगळ्यांपासून ती सगळीच मंडळी खूप दूर-दूर आहेत. ऐतखाऊ, बशे-पुरुष, विड्यांची धुराडी आणि छातीचे पिंजरे घेऊन पत्ते कुटणारे, उपासमार, दारिद्र्याने अजून त्यांची पाठ सोडलेली नाही. हातात कोयता घेऊन, कडेवर लेकरे घेऊन अजून त्या कष्ट करत आहेत. कदाचित हा निसर्गानेच साधलेला समतोल असेल का?- सुप्रिया जोशी, कोल्हापूर.
‘धनाची पेटी’
By admin | Published: March 06, 2017 12:41 AM