कोल्हापूर : जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या २०१९-२०२४ या पाच वर्षांच्या कालावधीकरिता झालेली निवडणूक बिन विरोध झाली. यात अध्यक्षपदी चेतन चौगुले यांची; तर उपाध्यक्षपदी रमेश हजारे यांची निवड झाली. अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष बाळ पाटणकर होते.शिवाजी स्टेडियम येथील कार्यालयात बुधवारी निवड झालेल्या अन्य कार्यकारिणीत केदार गयावळ (सचिव), अभिजित भोसले (खजानिस), जनार्दन यादव, ध्रुव केळवकर, अजित मुळीक (सहसचिव), तर सदस्यपदी माजी अध्यक्ष ऋतुराज इंगळे, राजेश केळवकर, कृ ष्णात धोत्रे, विजय सोमाणी, सतीश लोंढे यांचा समावेश आहे. यात राजेश केळवकर, लोंढे, सोमाणी यांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. तिघेही उत्तम दर्जाचे क्रिकेटर म्हणून पूर्वी नावाजलेले आहेत.
तीन नव्या चेहऱ्यांसह चौदाजणांची कार्यकारिणीजिल्हा क्रिकेट असोसिएशनचे आधारस्तंभ व सर्वांना बरोबर घेऊन जाणारे व्यक्तिमत्त्व असणारे आर. ए. तथा बाळ पाटणकर यांनी गेली ३५ वर्षे अध्यक्षपद सांभाळले. त्यांच्या कारकिर्दीमध्ये संघटनेला बळ मिळाले. त्यांच्या कारकिर्दीत अनेक स्पर्धा झाल्या. असोसिएशनला नव्या पिढीचे शिलेदार मिळावेत याकरिता स्वत:हून त्यांनी अध्यक्षपद सोडून तरुण रक्ताला वाव मिळावा, यासाठी निवडणूक बिनविरोध केली. त्यांच्यासोबत खजानिसपदाची धुरा सांभाळणारे बापूसाहेब मिठारी यांनीही राजीनामा दिला आहे. असोसिएशनमध्ये तीन नव्या चेहऱ्यांसह चौदाजणांची कार्यकारिणी असणार आहे.