कोल्हापूर : ‘गोकुळ’चे संचालक चेतन अरुण नरके व जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती, शिवसेनेचे गडहिंग्लज विभागाचे नेते संग्राम कुपेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत. कुपेकर हे शिवसेनेत अस्वस्थ आहेत.जिल्हा बँकेच्या निवडणुकीपासून त्यांची ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी जवळीक वाढली आहे, तर नरके यांनी राष्ट्रवादीचे युवा नेते आमदार रोहित पवार यांची भेट घेतली असून, दोघेही लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.दीड-दोन महिन्यांत जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांच्या तोंडावरच कुपेकर व नरके यांचा प्रवेश होणार असल्याचे समजते.
गडहिंग्लजमध्ये कुपेकर उपयोगी..
-संग्राम कुपेकर हे राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते, मात्र बाबासाहेब कुपेकर यांच्या निधनानंतर पक्षात त्यांना संधी मिळत नाही, असे वाटल्यानंतर त्यांनी ‘शिवबंधन’ बांधले. त्यांनी शिवसेनेतून २०१७ ची जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती, त्यानंतर २०१९ ला चंदगड विधानसभेची निवडणूक लढवली. मात्र दोन्ही निवडणुकांत त्यांना अपयश आले.- गेली पाच वर्षे ते पुनर्वसनासाठी धडपडत आहेत, मात्र पक्षाकडून त्यांना फारशी ताकद मिळाली नाही. ‘गोकुळ’, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमेदवारीसाठी त्यांनी जोरदार ताकद लावली होती; पण उमेदवारीच मिळाली नाही.- जिल्हा बँकेच्या निवडणुकीत त्यांनी गडहिंग्लज, चंदगड व आजरा तालुक्यातील संस्थात्मक ताकद सत्तारूढ आघाडीच्या मागे उभी केली. तेव्हापासून ते मंत्री मुश्रीफ यांच्या जवळ गेले. माजी आमदार संध्यादेवी कुपेकर या सध्या सक्रिय राजकारणापासून अलिप्त असल्याने गडहिंग्लजच्या राजकारणात संग्राम यांचा उपयोग राष्ट्रवादीला हाेणार आहे.
नरकेंना मंत्री मुश्रीफांचा हिरवा कंदील- चेतन नरके यांनी आपल्या व्यवस्थापन कौशल्याच्या बळावर युथ बँकेला अडचणीतून बाहेर काढल्याने सहकारातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांचे वडील अरुण नरके हे राजकारणापासून अलिप्त आहेत. त्यांचे बंधू संदीप नरके हे काँग्रेसमध्ये आहेत.- पन्हाळ्यात अरुण नरके यांची संस्थात्मक ताकद आहे, ही ताकद व चेतन यांनी सहकारात निर्माण केेलेल्या प्रतिमेच्या बळावर ‘गोकुळ’च्या निवडणुकीत त्यांनी मुसंडी मारली. ‘कुंभी’ कारखान्यासाठी त्यांनी कार्यक्षेत्रात मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.- त्यांनी भविष्यातील राजकारणाचा विचार करून राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांची भेट घेतली असून, मंत्री हसन मुश्रीफ यांनीही त्यांच्या प्रवेशाला हिरवा कंदील दाखवला आहे.
पन्हाळ्यात ताकद वाढविण्याचा प्रयत्न- जिल्हा बँकेच्या निवडणुकीपासून बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर हे पक्षापासून काहीसे बाजूला गेल्याचे दिसते.- ते राष्ट्रवादीसोबतच राहतील, असे सध्यातरी दिसते, तरीही चेतन यांना पक्षात घेऊन पन्हाळ्यातील ताकद वाढविण्याचा प्रयत्न मंत्री मुश्रीफ यांचा आहे.