कोल्हापूर : देशातील प्रगत जिल्ह्यात माझं कोल्हापूर खूप मागे राहिल्याची खंत मनात होती. अडीच-तीन वर्षे कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाचे एक स्वप्न घेऊन कार्यरत राहिलो. निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्त्यांसह जनतेचा खूप आग्रह होता, पण लोकसभेची निवडणूक आहे, येथे राजकीय पक्षाची ताकद निर्णायक ठरत असते, त्यामुळे निवडणूकीत थांबण्याचा निर्णय घेतल्याची माहीती ‘गोकुळ’चे संचालक डॉ. चेतन नरके यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.डॉ. नरके म्हणाले, गेली अडीच वर्षे बाराशेहून अधिक गावे पिंजून काढत जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानंतरही वाड्यावस्त्या विकासापासून खूप लांब आहेत. हे जरी खरे असले तरी नियोजनबध्द विकास केला तर कोल्हापूरचा चेहरामोहरा बदलू शकतो, या आत्मविश्वासाने काम करत गेलो. महाविकास आघाडीकडून उमेदवारी बऱ्यापैकी निश्चित झाल्याने वेगाने प्रचाराला लागलो होतो. पण, राजकारणात काहीही होऊ शकते. उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्ते अस्वस्थत झाले. थांबायचे नाही, लढायचे असा आग्रह त्यांचा होता. त्याचबरोबर माझं कोल्हापूर माझं व्हिजन’ या संकल्पनेला जनतेतून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. निवडणूक लढवण्याबाबत जनतेचाही आग्रह होता. मात्र, सहा विधानसभा मतदारसंघाचा हा मतदारसंघ आहे. अटीतटीच्या लढतीत पक्षीय ताकद महत्वाची असते यासह इतर बाबींचा विचार करुन थांबण्याचा निर्णय घेतला आहे. हे सांगताना खूप वेदना होतात, आयुष्यातील तीन वर्षे कोल्हापूरच्या विकासाचे व्हीजन घेऊन खर्ची घातले आणि त्यानंतर थांबावे लागते. पण, आयुष्यात चार पावलांची झेप घेत असताना कधी कधी दोन पाऊले मागे यावे लागते. ७ मे ला मतदान झाल्यानंतर ८ मे पासून ‘चेतन युवा सेतू ’संस्थेच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना स्वताच्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. यावेळी, सत्यशील संदीप नरके उपस्थित होते.
माघारीचा निर्णय सांगताना झाले भावूकगेली अडीच वर्षे कोल्हापूरचे व्हीजन घेऊन लोकसभेच्या रिंगणात उतरलो होतो, कोल्हापूरच्या जनतेचे पाठबळ मिळत असताना माघार घ्यावी लागते, हे सांगताता डॉ. चेतन नरके हे भावूक झाले.
पाठींब्याबाबत लवकरच निर्णयनिवडणूकीतून माघार घेतली आहे, अद्याप पाठींब्याबाबत निर्णय घेतलेला नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा करुन याबाबत निर्णय घेऊ असे डॉ. नरके यांनी सांगितले.