सातारा :आमदार जयकुमार गोरे व त्यांचे बंधू पंचायत समिती सदस्य शेखर गोरे यांच्या सत्तासंघर्षाचे रण ठरलेल्या आंधळी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी प्रचंड पोलीस फौजफाट्यात शुक्रवारी सातारा येथे झाल्या. शेखर गोरे गटाचे भिवाजी ज्ञानदेव शेंडे यांना आंधळी सोसायटीचे अध्यक्षपद तर जनार्दन गणपत खरात यांना उपाध्यक्षपद मिळाले. पण, अध्यक्ष भिवाजी शेंडे यांनी यापूर्वी केलेल्या गुन्ह्यात त्यांना पोलिसांनी तत्काळ अटक केली. आंधळीतील तणावाची परिस्थिती लक्षात घेऊन साताऱ्यातील भूविकास बँकेच्या सभागृहात शुक्रवारी या निवडी घेण्यात आल्या. दहिवडीच्या पोलीस उपाधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर यांच्या नेतृत्वाखाली भूविकास बँकेच्या परिसराला पोलिसांचा कडा पहारा देण्यात आला होता. या निवडीसाठी केवळ शेखर गोरे यांच्या गटाचे सात संचालक उपस्थित होते. आमदार जयकुमार गोरे गटाच्या संचालकांनी या निवडीकडे पाठ फिरविली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक एस. जी. गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी झाल्या. उपस्थित संचालकांमधूनच भिवाजी ज्ञानदेव शेंडे यांची अध्यक्षपदी तर जनार्दन गणपत खरात यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. आमदार जयकुमार गोरे आणि शेखर गोरे यांच्यात माण तालुक्यात निर्माण झालेल्या तीव्र सत्तासंघर्षाने दि. १९ मार्च रोजी हिंसक रूप धारण केले होते. आंधळी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षनिवडीची प्रक्रिया अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे होऊ शकली नाही, तेव्हा दोन्ही गटांकडून प्रचंड दगडफेक आणि घोषणायुद्ध झाल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. आंधळीत हिंसक जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला होता. आंधळीतील घटनेची पार्श्वभूमी लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडीच्या पोलीस उपाधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी भूविकास बँकेच्या येथील हुतात्मा चौकानजीकच्या कार्यालयाला पोलीस बंदोबस्त लावला होता. निवडीसाठी दाखल संचालक बँकेत दाखल झाल्यानंतर बँकेच्या बाहेरील मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले. कोणालाही आत सोडायचे नाही, असा कडक आदेश शिवणकर यांनी सोडला होता. निवडीवेळी प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी, छायाचित्रकारही याठिकाणी दाखल झाले होते; पण त्यांना सुरुवातीला प्रवेश नाकारण्यात आला होता. पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनंतर पत्रकारांना प्रवेश देण्यात आला. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पोलीस दक्ष होते. कोणी इसम प्रवेशद्वाराबाहेर घुटमळताना दिसल्यास पोलीस त्याला हटकत होते. तब्बल तीन तास हा तणाव होता. (प्रतिनिधी)आंधळीतील धुमश्चक्री नडलीनिवडीचा कार्यक्रम झाल्यानंतर अध्यक्ष भिवाजी शेंडे बँकेच्या बाहेर येताच त्यांना सहायक पोलीस निरीक्षक समाधान चौवरे यांनी अटक केली. मागील आठवड्यात आंधळीत झालेल्या धुमश्चक्रीनंतर कलम ३०७, ३९५ अन्वये याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात शेंडे यांना अटक करण्यात आल्याची माहिती चौवरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.पळशीकरांना पाठविले बाहेरमाण तालुक्यातील पळशी सोसायटी पदाधिकाऱ्यांच्या निवडीही शुक्रवारी होत्या. आंधळी सोसायटीच्या निवडी सुरू असतानाच पळशी सोसायटीचे संचालक भूविकास बँकेत दाखल झाले. गेटवर असणाऱ्या पोलिसांनी त्यांना आत प्रवेश दिला; पण पोलीस उपाधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर यांनी त्यांना हटकले. आंधळीचा कार्यक्रम झाल्यानंतर ‘आत या,’ तोवर ‘बाहेर थांबा’ अशा सूचना त्यांनी केल्यानंतर ही मंडळी बाहेर निघून गेली.शेखर गोरे समर्थक हजर संचालकभिवाजी ज्ञानदेव शेंडे, जनार्दन गणपत खरात, बाळासो सीताराम इंगळे, बापूराव गुलाबराव काळे, जगन्नाथ सिदू काळे, सुभद्रा शिवाजी काळे, शहाजी विठ्ठल काळे हे शेखर गोरे समर्थक संचालक यावेळी उपस्थित होते.जयकुमार गोरे समर्थक गैरहजर संचालककिसन आनंदराव सस्ते, संपत गुलाब माने, आप्पा संपत गोरे, शहाजी पांडुरंग पवार, लीलाबाई महिपती काळे, अर्जुन चांगदेव काळे या आमदार जयकुमार गोरे समर्थक संचालकांनी सोसायटी पदाधिकारी निवडीकडे पाठ फिरविली.
‘आंधळी’च्या निवडीनंतर अध्यक्षाला अटक!
By admin | Published: March 27, 2015 11:48 PM