न्यू पॅलेस, रमणमळा आदी परिसरातील ४०० जणांची केली राहण्याची सोय
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे न्यू पॅलेस, रमणमळा आदी परिसरातील घरामध्ये पुराचे पाणी घुसले. त्यामुळे तेथील सुमारे ४०० जणांना नवीन राजवाड्यातील छत्रपती शाहू हायस्कूलमध्ये स्वतः दखल घेऊन शाहू छत्रपती, मालोजीराजे, मधुरीमाराजे यांनी स्थलांतरित केले.
ज्या ज्या वेळी कोल्हापूरकर संकट आले त्या त्या वेळी छत्रपती घराण्याने ही संस्था, संघटना आणि प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून मदतीचा हात पुढे केला आहे. त्याचीच प्रचीती पुन्हा एकदा शुक्रवारी आली. सर्वत्र पूर परिस्थिती अचानकपणे आली. त्यात न्यू पॅलेस, रमणमळा परिसरातील अनेक कुटुंबे आडकली. ज्यांना नातेवाइकाकडे सोय आहे. अशी मंडळी त्यांच्याकडे आश्रयाला गेले. मात्र, ज्यांच्याकडे अशी सोयच नाही, अशा नागरिकांची सोय व्हावी या उद्देशने शाहू छत्रपती यांनी छत्रपती शाहू हायस्कूलमध्ये राहण्याची ४०० जणांची सोय केली. केवळ येथे राहण्याची नव्हे तर दोन वेळचा नाश्ता, जेवण, आरोग्य सुविधाही येथे उपलब्ध केली आहे. शुक्रवारी पहाटेपासून स्वतः जातीनिशी शाहू छत्रपती व मालोजीराजे, मधुरिमाराजे अनेकांना घरातून बाहेर काढून त्यांचे विस्थापण आपल्या चार मजली शाळेत केले आहे. तीन वर्षांपूर्वीही पुरामध्ये अडकलेल्या कुटुंबाची सोय याच शाळेत केली होती. त्याचे आठवणी येथे तात्पुरते राहण्यास आलेल्या नागरिकांनी काढल्या. या नागरिकांची योग्य सोय व्हावी याकरिता शेकडो कार्यकर्तेही राबत आहेत.