कोल्हापूरात दोन गटात तुफान राडा झाला आहे. सोशल मीडियातून आक्षेपार्ह मेसेज व्हायरल केल्याप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदची हाक पुकारली. या बंदला शहरवासियांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाही. हिंदुत्ववादी संघटनांचे हजारो कार्यकर्ते छत्रपती शिवाजी चौकात जमले. यावेली काही समाजकंटकांनी दगडफेक केल्याने पोलिसांना जमाव पांगवण्यासाठी लाठीमार करावा लागला. सध्या शहरात तणाव निर्माण झाला आहे. याचपार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विट करत कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शिवशाहूंच्या कोल्हापूर नगरीमध्ये औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या धर्मांध प्रवृत्तींना वेळीच चाप लावला पाहिजे. सरकारने दोषींवर कडक चार्जशीट दाखल करून इतकी कठोर कारवाई करावी, की परत औरंग्याचे उदात्तीकरण करण्याचे व सामाजिक सलोखा बिघडविण्याचे धाडस या राज्यात कुणाचे झाले नाही पाहिजे, असं संभाजीराजे यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.
कोल्हापूरमधील घटनेवर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, 'राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सगळ्यांचे सहकार्य आवश्यक आहे. राज्य सरकार सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेणारे सरकार आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम गृह विभागाचे आहे. मी संबंधित अधिकाऱ्यांशी वैयक्तिकरित्या बोलतोय, ते माझ्या संपर्कात आहेत. गृहमंत्रीही स्वतः अधिकाऱ्यांशी बोलत आहेत. कुणीही कायदा हातात घेऊ नये. कायदा हातात घेणाऱ्याला पाठिशी घातले जाणार नाही,' असा इशारा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.
दरम्यान, सोशल मीडियातून आक्षेपार्ह मेसेज व्हायरल केल्याप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या कोल्हापूर शहर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, शहरातील दैनंदिन व्यवहार ठप्प आहेत. हिंदुत्ववादी संघटनांचे हजारो कार्यकर्ते छत्रपती शिवाजी चौकात जमून संशयितांवर कडक कारवाई करण्याची मागणी करीत आहेत. काही कार्यकर्त्यांनी बिंदू चौक आणि गंजी गल्ली परिसरात परिसरात दगडफेक केल्याने पोलिसांना जमाव पांगवण्यासाठी लाठीमार करावा लागला.
जोतिबा डोंगरावर कडकडीत बंद
कोल्हापुरातील तणावाचे पडसाद जोतिबा डोंगरावर उमटले. संपुर्ण जोतिबा मंदिर मार्गावरील व गावातील दुकाने बंद ठेऊन बंदला नागरिकांचा शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. मात्र, भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी दर्शनासाठी जोतिबा मंदिर खुले ठेवण्यात आले होते.