कोल्हापूर : मागील काही काळात महापूर, कोरोना, अतिवृष्टी यांसारख्या संकटांमुळे शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट बनली आहे. केंद्र सरकारने एक रकमी एफआरपी देण्याचे स्पष्ट केले असेल तरी राज्य सरकारने अजून कोणतीच भूमिका स्पष्टपणे मांडलेली नाही. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सहाय्य म्हणून एकरकमी एफआरपी देण्याची घोषणा कागलच्या छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी सोमवारी केली.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या शेतकरीकेंद्री विचारांचा वारसा जपत आपल्या बळीराजाला शक्य ती सर्व मदत करण्यासाठी शाहू समूह कायम तत्पर आहे असेही त्यांनी म्हटले आहे. शाहू कारखाना शेतकऱ्यांना ऊसदर देण्यात कायमच महाराष्ट्रात पुढे राहिला आहे. त्यामुळे या कारखान्याच्या विरोधात शेतकरी संघटनेला दरासाठी कधीच आंदोलन करावे लागलेले नाही. याउलट शाहू कारखाना चांगला दर देतो मग तुम्हांला काय धाड भरली आहे का.? अशी विचारणा संघटना करत आल्या आहेत.आताही शाहू कारखाना एकरकमी एफआरपी देणार असल्याने राज्यातील सर्व कारखान्यावर त्याचा नक्कीच दबाव वाढणार आहे.एका अर्थाने ऊसदराच्या चळवळीला त्याचे बळ मिळणार आहे.