कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांनी मंगळवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करून तीन अर्ज दाखल केले. कोल्हापूरचा एकच आवाज..शाहू महाराज...शाहू महाराज अशी घोषणा सगळीकडे घुमली. तत्पूर्वी त्यांनी दसरा चौकातील राजर्षि शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मिरवणूकीस सुरुवात केली. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले लोक त्यामध्ये सहभागी झाले होते. त्यामध्ये महिलांचीही संख्या लक्षणीय होती. उन्हाचा तडाखा असतानाही कार्यकर्त्यांचा उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता.
मिरवणूकीत सजवलेल्या गाडीवर शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार जयश्री जाधव, व्ही.बी.पाटील, विजय देवणे, विश्वास पाटील, ए.वाय.पाटील, स्वाती शिंदे, आपचे संदिप देसाई, मधुरिमाराजे आदींसह आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख नेते सहभागी झाले. काँग्रेससह शिवसेना, राष्ट्रवादी पवार गट, शेतकरी कामगार पक्ष. डावे पक्ष, आपचे कार्यकर्ते मिरवणूकीत सहभागी झाले. मिरवणूकीचे पुढचे टोक असेंब्ली रोडवर तर शेवटचे टोक दसरा चौकात होते.
तीन अर्ज दाखलशाहू छत्रपती यांनी तीन अर्ज भरले. ते भरताना त्यांच्या सोबत सरोज पाटील, संजयबाबा घाटगे, दिलीप पवार, प्रा.सुनिल शिंत्रे, आर.के.पोवार, विजय देवणे, नंदा बाभूळकर, सुनिल मोदी, ॲड, राजेंद्र चव्हाण, अजित फराकटे. अमोल पवार हे मान्यवर होते. सर्व घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांना त्यास स्थान देण्यात आले.
शाहू-शिवराय...मिरवणुकीत घटक पक्षांच्या झेंड्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षि शाहू छत्रपती यांचे चित्र असलेले भगवे ध्वज सर्वात जास्त होते. त्याबद्दलही लोकांत उत्सुकता होती. राहूल गांधी, उध्दव ठाकरे, शरद पवार यांच्यासह अरविंद केजरीवाल, आदित्य ठाकरे यांचेही छोटे फोटो सगळीकडे झळकत होते.
घाटगे-खानविलकरही..मिरवणुकीत कागलच्या घाटगे घराण्यातील प्रविणसिंह घाटगे, दिग्विजय खानवलिकर यांचे कुटुंबीय, छत्रपती घराण्यातील झाडून सारे सदस्य हिरीरीने सहभागी झाले. प्रविणसिंह घाटगे यांचे पुतणे व भाजपचे नेते समरजित घाटगे हे काल महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचा अर्ज दाखल करण्यास सर्वात पुढे होते. प्रविणसिंह घाटगे यांचे पूर्वापार छत्रपती घराण्याशी चांगले संबंध असल्याने ते दसरा चौकातून चालत मिरवणुकीत सहभागी झाले.