कोल्हापूर : आपल्या क्रांतिकारी विचारांनी अन्य संस्थानिकांपेक्षा वेगळे ठरलेले छत्रपती शाहू महाराजांचे डॉ. जयसिंगराव पवार लिखित जीवनचरित्र आता रशियन आणि इटालियन भाषेत प्रकाशित होणार आहे. आतापर्यंत सहा भारतीय भाषांमध्ये आणि दोन विदेशी भाषांमध्ये हे चरित्र प्रकाशित झाले आहे.डॉ. पवार यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीने शाहू चरित्र भारतीय सर्व भाषांमध्ये आणि विदेशी मुख्य भाषांमध्ये प्रकाशित करण्याचा संकल्प केला होता. त्याला अनुसरून आतापर्यंत मराठी, कोकणी, कन्नड, तेलगू, उर्दू आणि गुजराती या भारतीय भाषांमध्ये तर इंग्रजी आणि जर्मन या विदेश भाषांमध्येही हे चरित्र प्रकाशित झाले आहे.या ग्रंथाचा रशियन अनुवाद डॉ. मेघा पानसरे आणि प्रा. तत्याना बिकवा यांनी केला आहे, तर इटालियन अनुवाद डॉ. अलेस्सांद्रा कोन्सोलारो यांनी केला आहे. यातील प्रा. तत्याना बिकवा यांचे हे अनुवादाचे काम पूर्ण झाल्यानंतर निधन झाले आहे.
शनिवारी प्रकाशन सोहळाया दोन्ही भाषांतरित ग्रंथांचे प्रकाशन शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दीच्या समारोपादिवशी शनिवारी, ६ मे रोजी ‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक, गांधीवादी विचारवंत सुरेश द्वादशीवार यांच्या हस्ते आणि शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के हे अध्यक्षस्थानी असतील. सकाळी ११ वाजता शाहू सिनेट सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.
शाहू विचार काळाच्या पुढचे आहेत. त्यामुळेच ते भारतभर आणि जगभर प्रसारित व्हावेत यासाठी महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीच्या वतीने आम्ही कार्यरत आहोत. यातील मराठी वगळता अन्य भारतीय आणि विदेशी भाषांमधील अनुवादित ग्रंथ प्रबोधिनीतर्फे सर्व विद्यापीठे आणि साहित्य संस्थां, प्रमुख ग्रंथालयांना मोफत वितरित केले जातात. - डॉ. जयसिंगराव पवार, शाहू चरित्रकार