विश्वास पाटीलकोल्हापूर : राज्यसभेची निवडणूक संभाजीराजे छत्रपती यांनी लढविण्याचा निर्णय घेतल्यापासूनच संभाजीराजे व कोल्हापूरचे छत्रपती घराणे राज्याच्या राजकारणात चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले. त्यातच शाहू छत्रपती यांनी संभाजीराजे यांना उमेदवारी मिळाली नाही, याचा अर्थ छत्रपती घराण्याचा अवमान नव्हे, अशी जाहीर भूमिका घेतली. त्यामुळे हे घराणे चर्चेत आले. त्यामुळे हे घराणे नेमके आहे तरी कसे याचा वेध...
- कोल्हापूरचे छत्रपती घराणे हे थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर छत्रपती शाहू महाराज यांचे थेट वंशज असणारे घराणे आहे.
- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दोन मुलांपैकी एक छत्रपती संभाजीराजे व दुसरे छत्रपती राजाराम महाराज. छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी महाराणी ताराराणी यांनी कोल्हापूरच्या गादीची स्थापना केली. त्यामुळे सातारा व कोल्हापूर अशा दोन संस्थानांची स्थापना झाली.
- कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचे आता मुख्य अधिपती म्हणून श्रीमंत शाहू छत्रपती (वय ७४) आहेत. ते नागपूरच्या भोसले घराण्यातून दत्तक आले आहेत. त्या घराण्यात त्यांचे नाव दिलीपसिंह भोसले असे होते. त्यांनी लोकसभेच्या १९९८च्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. परंतु, महिन्याभरानंतर पुन्हा ते कधीच शिवसेनेत सक्रिय झाले नाहीत.
- कोल्हापूरचे शाहू छत्रपती यांची माजी खासदार संभाजीराजे व माजी आमदार मालोजीराजे ही दोन मुले आहेत.
- संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून २००९ला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रथमच निवडणूक लढवली. पण अपक्ष उमेदवार व दिग्गज दिवंगत नेते सदाशिवराव मंडलिक यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर ते कोणत्याही राजकीय पक्षात सक्रिय नाहीत. त्यांना २०१६मध्ये भाजपने राष्ट्रपती नियुक्त कोट्यातून खासदार केले होते.
- मालोजीराजे हे कोल्हापूर शहर मतदार संघातून काँग्रेसतर्फे २००४ला आमदार झाले होते. त्यानंतरच्या निवडणुकीत त्यांचा शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांनी पराभव केला. त्यानंतर सध्या ते पुण्यातील शिवाजी मेमोरियल एज्युकेशन संस्थेचे पूर्णवेळ काम पाहतात.
- सातारचे छत्रपती घराणे नावाच्या अगोदर ‘छत्रपती’ हा बहुमान वापरते. कोल्हापूरचे घराणे आडनाव म्हणून ‘छत्रपती’ वापरतात.
- श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या पत्नीचे नाव महाराणी याज्ञसेनीराजे असे आहे. त्या मूळच्या कर्नाटकातील अथणीतील पवार घराण्यातील आहेत.
- संभाजीराजे यांच्या राणीसाहेबांचे नाव संयोगिताराजे असे आहे. त्या छत्तीसगडमधील धमतरीच्या किरदत्त घाटगे घराण्यातील आहेत.
- मालोजीराजे यांच्या राणीसाहेबांचे नाव मधुरिमाराजे आहे. त्या मूळच्या कोल्हापूरच्या असून, माजी आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या कन्या आहेत.
- संभाजीराजे यांच्या चिरंजीवाचे नाव युवराज शहाजीराजे असे आहे. मालोजीराजे यांच्या चिरंजीवाचे नाव युवराज यशराजराजे व कन्येचे नाव युवराज्ञी यशस्विनीराजे असे आहे.
- कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराज यांना ‘राजर्षी शाहू छत्रपती’ असे म्हटले जाते. विद्यमान छत्रपतींना ‘श्रीमंत शाहू छत्रपती’ म्हटले जाते.
- राजर्षी शाहू महाराज हे कागलच्या घाटगे घराण्यातून कोल्हापूरच्या गादीवर दत्तक आले आहेत. म्हणजे कागलचे घाटगे हे शाहू महाराज यांचे जनक घराणे आहे. या घराण्याचे कागलच्या शाहू साखर कारखान्याचे संस्थापक दिवंगत विक्रमसिंह घाटगे व आताचे भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे हे वारसदार आहेत.