सातारा : गेल्या तीन वर्षांपासून ठप्प असलेले छत्रपती शिवाजी संग्रहालय पूर्णत्वाकडे जाण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मंत्रालय सचिव स्तरावर झालेल्या बैठकीत संग्रहालय बांधकाम विभागाकडून पुरातत्व खात्याकडे हस्तांतरीत करण्याच्या सूचना करण्यात आल्या असून, त्यानुसार हे संग्रहालय पुरातत्व विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आले आहे. अतंर्गत फर्निचर व रंगरंगोटीच्या कामासाठी शासनाकडून २ कोटी २५ लाख रुपये निधीची तरतूद केली जाणार आहे.साताऱ्यात उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी संग्रहालयामुळे शहराला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त होणार आहे. मात्र, निधीअभावी संग्रहालयाचे भिजत घोंगड अद्याप कायम आहे. संग्रहालयाच्या इमारतीचे बांधकाम २००९ मध्ये सुरू झाले. यावेळी ६ कोटी १९ लाखांचा निधी मंजूर झाला. मधल्या तीन वर्षांच्या काळात निधी उपलब्ध न झाल्याने संग्रहालयाचे काम रखडले. शासनस्तरावरून प्रयत्न झाल्यानंतर तसेच नागरिकांनी उपोषण केल्यानंतर २१ आॅक्टोबर २०१४ रोजी शासनाने १ कोटी ८१ लाख १७ हजार ३८२ रुपयांचा निधी मंजूर केला.या निधीतून संग्रहालयातील अंतर्गत कामे, पेव्हर ब्लॉक, डोम, रॅम्प तसेच पार्किंगमधील प्लास्टर, मुख्य व अंतर्गत दरवाजे आदी कामे करण्यात आली. मात्र, २०१४ पासून पुन्हा संग्रहालयाचे काम ठप्प झाले. अंतर्गत फर्निचर व रंगरंगोटीचे काम मार्गी लावण्यासाठी या संग्रहालयाचे पुरातत्व विभागाकडे हस्तांतरण करणे गरजेचे होते.या संग्रहालयाची वास्तविक परिस्थिती ‘लोकमत’ने वारंवार मांडल्याने मंत्रालय सचिव स्तरावर १५ फेब्रुवारी रोजी बैठक बोलविण्यात आली. या बैठकीत शिवाजी संग्रहालय हस्तांतरीत करण्यात यावे, अशा सूचना पुरातत्व विभाग, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना करण्यात आल्या. यानंतर तत्काळ कार्यवाही म्हणून ५ एप्रिल २०१७ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रकाश मोहिते, अभिरक्षक छत्रपती शिवाजी संग्रहालय एस. ए. सुर्वे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता दिग्विजय वंजारी यांची संयुक्त बैठक होऊन संग्रहालय पुरातत्व विभाग सातारा अभिरक्षक छत्रपती शिवाजी संग्रहालयाकडे हस्तांतरीत करण्यात आल्याचा लेखी निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी संग्रहालयाचे काम ज्या गतीने व्हायला होते, ते निधीअभावी होऊ शकले नाही. निधीसाठी १८ फेब्रुवारी २०१३ रोजी एकदिवसीय उपोषण केले. तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडेही निधीची मागणी केली. यानंतर संग्रहालयासाठी २१ आॅक्टोबर २०१४ रोजी १ कोटी ८१ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. या पाठपुराव्याला ‘लोकमत’चे मोठे पाठबळ मिळाले. संग्रहालय नुकतेच पुरातत्व खात्याकडे हस्तांतरीत झाल्याने या संग्रहालयाच्या पूर्णत्वाचा मार्ग मोकळा झाला आहे. भविष्यात चांगल्या प्रकारे काम व्हावे ही तमाम शिवभक्त व सातारकरांची अपेक्षा आहे.- जितेंद्र वाडकर, विश्व हिंदू परिषद, शहरमंत्री, सातारा२ कोटी २५ लाख रुपयांची तरतूदछत्रपती शिवाजी संग्रहालय पुरातत्व विभागाकडे हस्तांतरीत झाले असून, संग्रहालयाच्या अंतर्गत फर्निचर व रंगरंगोटीचे काम आता लवकरच मार्गी लागणार आहे. याकामी राज्य शासन २ कोटी २५ लाखांचा निधी देणार आहे. पुरातत्व विभाग कोल्हापूर येथील गजभर या खासगी आर्किटेक्चर कंपनीमार्फत ही कामे पूर्ण करणार आहेत.
छत्रपती शिवाजी संग्रहालय ‘पुरातत्व’कडे हस्तांतरीत...
By admin | Published: April 09, 2017 12:55 AM