कोल्हापूर : शिवजयंतीनिमित्त शुक्रवारी सकाळी अकरा वाजता हुतात्मा पार्कात छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेडतर्फे उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार केला जाणार आहे.
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन आदेशानुसार शिवजयंती मिरवणूक काढली जाणार नाही. त्याऐवजी उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्ती व संस्थांचा सत्कार केला जाणार आहे. यात आ. चंद्रकांत जाधव, बैतुल माल कमिटी (जाफरबाबा व अन्य सहकारी), राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांचा समावेश आहे, अशी माहिती ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष फिरोज खान उस्ताद यांनी दिली.
गाथा शिवपराक्रमाची या पुस्तकाचे आज प्रकाशन
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील पराक्रमाचा दाखला देणाऱ्या काही निवडक प्रसंगांचे संकलित स्वरूप गाथा शिवपराक्रमाची या पुस्तिकेचे प्रकाशन ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक डाॅ. अमर अडके यांच्या हस्ते गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला हिंदू एकता कार्यालय, विठ्ठल मंदिर, मिरजकर तिकटी येथे होणार आहे, अशी माहिती नगरसेवक अजित ठाणेकर यांनी दिली.
शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय
कोल्हापूर : मंगळवार पेठेतील ऐतिहासिक कैलासगडची स्वारी मंदिरात शुक्रवारी होणारी शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला आहे, अशी माहिती सचिव अशोक मेस्त्री व विलास गौड यांनी दिली.
यानिमित्त राज्य शासनाने मान्यता मिळालेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैलचित्राचे पूजन मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे. केवळ भजन, पाळणा, प्रसाद वाटप केला जाणार आहे. हा निर्णय मंदिराचे अध्यक्ष बबेराव जाधव व उपाध्यक्ष आ. चंद्रकांत जाधव आणि विश्वस्त मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. भक्तांनी शिवजयंतीला हजर राहताना शासन नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे, असेही मेस्त्री व गौड यांनी स्पष्ट केले आहे.
छत्रपती शिवाजी चौकात उद्या शिवजन्मकाळ सोहळा
कोल्हापूर : युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे छत्रपती शिवाजी चौकात शुक्रवारी सकाळी १० वाजून १० मिनिटांनी जन्मकाळ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी महापौर आर.के. पोवार यांनी दिली.
या सोहळ्यासाठी तिन्ही खासदार व आमदार, महापौर, महापालिका पदाधिकारी व शासकीय अधिकाऱ्यांसह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. नागरिकांनी कोरानासंदर्भातील नियम पाळून सकाळी पावणेदहा वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन सोहळा शहाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष उदय शिंदे, विश्वस्त सचिन शिंदे, माजी नगरसेवक ईश्वर परमार, आदील फरास, रमेश पोवार, माजी नगरसेविका उमा बनछोडे यांनी केले आहे.