छत्रपतींचे वंशज हे फक्त मालमत्तेचेच वारसदार : ज्ञानेश महाराव
श्री भोसले कुलाचा वंशवृक्ष’ या पुस्तकांचे प्रकाशन सोहळा : मराठ्यांची चळवळ संपविण्याचे काम : नीतेश राणे
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांचे आताचे वंशज हे फक्त त्यांच्या मालमत्तेचेच वारसदार आहेत. यातील एकजण कॉलर उडवितो तर दुसरा खासदारकीसाठी आपले इमान व विचार विसरतो, अशा शब्दात ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी रविवारी येते खासदार संभाजीराजे व खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव न घेता टीकेची झोड उठविली.याच कार्यक्रमात आमदार नीतेश राणे यांनी मराठा नेत्यांची महामंडळे, खासदार, आमदार अशा पदांवर वर्णी लावून मराठा आरक्षणाची चळवळ संपविण्याचे काम सुरु आहे, अशी टीका केली. राजर्षी शाहू स्मारक भवन येथे इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत लिखित ‘शिवछत्रपतींच्या समाधीचा शोध व बोध’, ‘श्री भोसले कुलाचा वंशवृक्ष’ या पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यात सोमवारी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी आमदार नीतेश राणे यांच्यासह मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे, जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, वैभवराजे भोसले, उद्योजक चंद्रकांत जाधव आदी प्रमुख उपस्थित होते. नीतेश राणे व राजेंद्र कोंढरे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन झाले. महाराव यांनी जो कधी शाहीर झाला नाही तो शिवशाहीर आणि खरा इतिहास ज्याने कधी लिहिला नाही त्याला ‘महाराष्ट्र भूषण’ अशा शब्दात शिवशाही बाबासाहेब पुरंदरे यांचे नाव न घेता खरपूस समाचार घेतला. खरे शिवाजी महाराज समजायचे असतील तर प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजले पाहीजेत, त्यानंतर राजर्षी शाहू महाराज व त्यानंतर महात्मा फुले समजून घेतले पाहिजेत. महाराव म्हणाले, माणूस नुसता विचारवंत असून चालणार नाही तर तो कृतिशील असला पाहीजे. त्यांच्या कृतीवर इतरांनी डॉक्टरेट मिळविली पाहीजे. ज्याची किंमत चुकवायची तयारी आहे त्यालाच शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचा अधिकार आहे. नीतेश राणे म्हणाले, इतिहासाबद्दल छेडछाड केली जात असल्याने आताच्या पिढीसमोर दोन प्रकारचे इतिहास येत आहेत. त्यामुळे यातील खरा इतिहास कोणता याबाबत संभ्रम आहे. शिवाजी महाराजांबद्दल खोटा इतिहास मांडण्याचा खेळ मांडला जात असून ते रोखण्याची गरज आहे. मराठा मोर्चातील एक तरी मागणी या सरकारने पूर्ण केली का? हे तपासून त्यांना जाब विचारण्याची वेळ आली आहे. कोपर्डी प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाट असून आहेत. कदाचित त्यांना पारदर्शकपणे फाशी दिली असेल. कारण आता पारदर्शकतेचा जमाना आहे. राजेंद्र कोंढरे म्हणाले, कोल्हापूरच्या कर्मभूमीतील इतिहास संशोधकांनी आपले आयुष्य खर्च करुन योग्य इतिहास समोर आणण्याचे काम केले आहे. ते मौल्यवान असून त्यांचा सर्वांनी मानसन्मान राखण्याची गरज आहे. इंद्रजीत सावंत यांनी पुस्तकाविषयी माहिती देताना ‘भोसले कुलाचा वंशवृक्ष’मध्ये नारायणापासून शाहूंपर्यंत १६१ व्यक्तींचा समावेश आहे तर शहाजी महाराज, छत्रपती शिवाजी, जिजाऊ आदींच्या १४० मुद्रांचा समावेश आहे. ‘शिवछत्रपतींच्या समाधीचा शोध व बोध’ मध्ये खोटा इतिहास खोडून काढण्याचे काम केले आहे. देविकाराणी पाटील यांनी प्रास्ताविक केले. सचिन तोडकर यांनी आभार मानले.
५०० पुस्तके वाटणार
इंद्रजीत सावंत यांनी लिखित ५०० पुस्तके खरेदी करुन ती विविध मान्यवरांना वाटून खऱ्या इतिहासाचा प्रसार करण्याचे काम करणार असल्याचे नीतेश राणे यांनी सांगितले.
आमच सरकार आल्यावर इंद्रजीत सावंतना ‘महाराष्ट्र भूषण’
पुढील सरकार आमचच येणार आहे. यामध्ये मी एखाद्या मोठ्या पदावर गेल्यावर इंद्रजीत सावंत यांना ‘महाराष्ट भूषण’ पुरस्कार देऊ, अशी ग्वाही राणे यांनी दिली.
खरे जातीयवादी कोण?
निवडणुकीनंतर तलवारीला शेंडी भारी पडली असे संदेश वॉट्सअप वरुन फिरत होते. हा जातीयवाद नव्हे का ? असा सवाल करत खरा जातीयवादी कोण हे पाहण्याची गरज असल्याचे राणे यांनी सांगितले.
सत्संगासारखा दुसरा वाईट बाजार नाही
सत्संगाच्या नावावर बुवा बाबांनी लोकांकडून लोकांची दिशाभूल केली जाते. या सारखा दुसरा कुठलाही वाईट बाजार नसून या ठिकाणी महिलाही सुरक्षित नसल्याचे ज्ञानेश महाराव यांनी सांगितले. वास्तव समजण्यासाठी इतिहास वाचा इतिहास आपण वाचत नाही, त्यामुळे वास्तव आपल्याला कळत नाही, त्यासाठी इतिहासाची पुस्तके वाचली पाहीजेत, असे महाराव यांनी सांगितले.