नवे पारगाव : चारीत्र्याच्या संशयावरून व पैशाच्या देवघेवी वरुन घुणकी (ता. हातकणंगले) येथील युवकाने पत्नीचा दगडाने ठेचून खून केला. ही घटना वाठार (ता.हातकणंगले) येथे गुरुवारी मध्यरात्री घडली. बिस्मिल्ला आदम पठाण (वय ३२) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे.घटनेची नोंद पेठवडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.या घटनेतील संशयीत आदम गौस पठाण (वय ३७) यास वडगाव पोलिसांनी अटक केली आहे.घटनास्थळावरून व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी :आदम व बिस्मिल्ला यांचा वीस वर्षांपूर्वी विवाह झाला होता. आदमचे वडील गौस, आई दुल्हन पत्नी बिस्मिल्ला, मुलगे आमीर, आदिल असे राहत होते.
आदम इचलकरंजी येथील खाजगी इंडस्ट्रीज मध्ये नोकरीला होता. बिस्मिल्ला या आदिल बँगल स्टोअर्स व एका मार्केटिंग कंपनीचे काम करीत होत्या. या दोघात गेली अनेक वर्षे चारित्र्याच्या संशयावरून व पैशाच्या देवघेवीवरुन वारंवार वाद व्हायचे.गुरुवारी (दि.६) सायंकाळी वाद झाल्यानंतर आदम व बिस्मिल्ला दोघेही वाठार येथे गेले होते. सिमेंट फॅक्टरी जवळ त्यांच्यात पुन्हा जोराचा वाद झाला. आदमने रागाने बिस्मिल्लाला दगडाने जोराने मारहाण केली. यात तिचा मृत्यू झाला. आदमने खून केल्याची कबुली देऊन स्वतः फिर्याद दिली.
या घटनेनंतर मृतदेहाचे शवविच्छेदन नवे पारगाव येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ. बी. एस. लाटवडेकर यांनी केले.घटनेची माहिती कळताच बिस्मिल्लाच्या चिकुर्डे येथील माहेरच्या नातेवाईकानी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळ तणावाचे वातावरण होते. सकाळी अकराच्या सुमारास बिस्मिल्ला यांचचा मृतदेह दफन करण्यात आला.बिस्मिल यांच्या मागे पत्ती आदम सासू सासरे दोन मुलगे असा परिवार आहे. दोन्ही मुले घुणकी येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल मध्ये शिक्षण घेत असून दोघेही शाळेत हुशार आहेत. बिस्मिल्ला यांचे माहेर सांगली जिल्ह्यातील चिकुर्डे येथील असून माहेरी वडील, सावत्र आई, सावत्र भाऊ बहिणी आहेत.बिस्मिल्ला पठाण