विनोद सावंत कोल्हापूर : शाहू क्लॉथ मार्केट परिसरातील कोंबडी बाजार येथे महापालिकेच्या मालकीचे ४५ गाळे आहेत. व्यापारी संकुल उभारण्यासाठी गाळे सील करण्यात आले आहेत. दोन वर्षे होत आले तरी व्यापारी संकुलही नाही आणि गाळेही सील अशी स्थिती आहे. त्यामुळे गाळे धूळ खात पडले असून, येथील जागेत रात्रीच्या वेळी अवैध व्यवसाय होत आहेत. पार्किंगच्या जागेत भंगारविके्रत्यांनी अतिक्रमण केले आहे. कोंबडी बाजार येथील प्रकल्पाची जागा ‘भंगार बाजार’ने घेतली आहे.माळकर तिकटी, हत्तीमहाल रोड ते मोदीखाना या मार्गावर १९७८ मध्ये ४५ विके्रते व्यवसाय करीत होते. तत्कालीन आयुक्त यांनी शहराच्या विकासासाठी ४ जानेवारी १९७९ रोजी रस्ता रुंदीकरणाच्या हेतूने येथील विके्रत्यांना शाहू क्लॉथ मार्केटच्या पिछाडीस पुनर्वसन केले. गेल्या ४० वर्षांपासून येथे विके्रते व्यवसाय करीत होते.
या जागेत ‘बांधा, वापरा आणि हस्तांतर करा,’ या तत्त्वावर व्यापारी संकुल उभारण्यासाठी १५ फेब्रुवारी २०१८ रोजी येथील गाळे सील करण्यात आले. दरम्यान, महापालिकेने दिलेल्या नोटिसीच्या विरोधात विके्रत्यांनी न्यायालयात धाव घेतली. महापालिका आणि गाळेधारक यांच्यातील वादात प्रकल्प रखडला. काही गाळेधारकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामधील काही गाळेधारकांनी या परिसरात मिळेल तेथे उघड्यावरच व्यवसाय सुरू केले आहेत.
कोंबडी बाजार येथील व्यापारी संकुलासाठी गाळेधारकांसोबत लवकरच बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल. गाळेधारकांच्या शंकांचे निरसन झाल्यानंतर तत्काळ निविदा प्रसिद्ध केली जाईल.- नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता, महापालिका
सामोपचाराने निर्णय व्हावापोलीस बळावर महापालिका प्रशासनाने गाळे ताब्यात घेतले. या विरोधात लोकन्यायालयातही दाद मागितली आहे; परंतु निर्णय झालेला नाही. यामध्ये महापालिका आणि गाळेधारक दोघांचेही नुकसान होत आहे. वास्तविक सामोपचाराने निर्णय होणे शक्य आहे. लवकरच आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची भेट घेणार आहे.- विकास पुजारी, उपाध्यक्ष, कोंबडी बाजार गाळेधारक संघ
कोंबडी बाजार येथे विके्रते
- स्थलांतर -४ जानेवारी १९७९
- गाळे सील- १५ फेबु्रवारी २०१८
- गाळे संख्या-४५
- मनपाचे जागेबाबत नियोजन - ‘बीओटी’वर व्यापारी संकुल उभारणे
- नियोजित व्यापारी संकुल- पाच मजली इमारत, गाळे, बँकांसाठी हॉल, महापालिका कार्यालय
गाळेधारकांची भूमिका
- व्यापारी संकुलात गाळे देणार असल्याचे लेखी आश्वासन मिळावे.
- व्यापारी संकुल पूर्ण होईपर्यंत परिसरातच तात्पुरते पुनर्वसन करावे.
गाळेधारक, महापालिकाही तोटादोन वर्षांमध्ये व्यापारी संकुलही नाही आणि गाळ्यातून उत्पन्नही नाही, अशी परिस्थिती आहे. महापालिकेच्या दोन वर्षांत तब्बल सहा लाखांचे भाडे बुडाले आहे; तर गाळेधारकांचा व्यवसाय बुडाला आहे.