(मुख्यमंत्री व सतेज पाटील फोटो वापरता येतील)
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सारथी उपकेंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात ऑनलाइन मनोगत व्यक्त करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांचे शनिवारी कौतुक केले. ''सतेज यांच्या नावात तेज आहे, गती आहे. त्याप्रमाणेच सोमवारपासून सारथी उपकेंद्र कोल्हापुरात सुरू होईल'' असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनीही सतेज पाटील यांनी समन्वयाचे चांगले काम केल्याचे सांगितले.
कोल्हापुरात खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मराठा क्रांती मूक आंदोलनावेळी पालकमंत्री म्हणून भूमिका मांडताना सतेज पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सकारात्मक आहे. त्यासाठी संभाजीराजे यांनी उद्याच मुंबईला यावे, तुमच्या सोबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री तयार आहेत, आपण आपली वेळ द्यावी, असे आवाहन केले होते. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी संभाजीराजे यांची मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्र्यासोबत बैठक झाली. मूक आंदोलन होऊन अवघे १० दिवस पूर्ण होताच सारथीच्या कोल्हापूर उपकेंद्राचे उद्घाटन झाले. पालकमंत्री पाटील यांनी उपकेंद्रासाठी शहरातील चार वेगवेगळ्या ठिकाणी जागा तसेच इमारतींची पाहणी करून राजाराम महाविद्यालयातील इमारत उपकेंद्रासाठी निश्चित केली. ही इमारत निश्चित होताच अवघ्या १८ तासांच्या काळात इमारतीची स्वच्छता, डागडुजी, रंगरंगोटी आदी कामे युद्धपातळीवर पूर्ण करून घेतली. उपकेंद्राच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यशासन याच्यांशी सातत्याने समन्वय ठेवून शाहू महाराज जयंतीदिनीच या उपकेंद्राचे उद्घाटन पार पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. कोणतेही काम एकदा मनावर घेतले की ते तडीस नेण्याच्या त्यांच्या कार्यशैलीचे प्रत्यंतर आले.