मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री बुधवारी कोल्हापुरात; शेंडा पार्क रुग्णालय भूमिपूजन, जिल्हा बँक इमारतीचे उद्घाटन होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 12:35 PM2024-10-07T12:35:36+5:302024-10-07T12:36:35+5:30
'आरोग्य सेवेत मुश्रीफ यांचे नाव'
कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित बुधवारी (दि. ९) सायंकाळी ५ वाजता तपोवन मैदानावर होत असलेला मेळावा यशस्वी करा, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
शेंडापार्क येथील ११०० खाटांच्या रुग्णालयाचे भूमिपूजन, जिल्हा बँकेच्या विस्तारित इमारतीचे उदघाटन व मेळाव्याच्या नियोजनासाठी रविवारी शासकीय विश्रामगृहात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, कोल्हापुरातील सामान्य माणसाला उपचारासाठी बाहेर जाण्याची गरज भासू नये, यासाठी प्रशस्त असे रुग्णालय मंजूर केले. विविध वैद्यकीय महाविद्यालये सुरू करत आहोत, इतकी चांगली आरोग्य सेवा पश्चिम महाराष्ट्रात कोठेही नाही. यासह इतर उदघाटनासाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री कोल्हापुरात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत मेळावा होत आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आतापासूनच कामाला लागा. खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक, महेश जाधव यांनी मार्गदर्शन केले.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने, भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, माजी नगरसेवक सत्यजीत कदम, विजय जाधव आदी उपस्थित होते. जिल्हा बँकेचे संचालक भय्या माने यांनी आभार मानले.
‘तपोवन’वर १५ हजार कार्यकर्त्यांचा मेळावा
तपोवन मैदानावर १५ हजार खुर्च्या लावणार आहेत. भाजपने ३, तर शिंदेसेनेने २ हजार कार्यकर्ते आणावेत. राष्ट्रवादी काँग्रेस १० हजार कार्यकर्ते आणेल, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
विकासकामे सांगताना दम लागतोय
गेल्या अडीच वर्षांत महायुती सरकारच्या माध्यमातून हजारो कोटींचा निधी कोल्हापुरात आला. ही कामे सांगताना दम लागतो. त्यामुळे आगामी निवडणुकीत हीच कामे जनतेपर्यंत पोहोचवा, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.
आरोग्य सेवेत मुश्रीफ यांचे नाव
दिवंगत नेते दिग्विजय खानवलिकर यांनी ‘सीपीआर’च्या माध्यमातून कोल्हापुरात चांगले काम केले. त्यांच्या पाठोपाठ आता पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव घेतले जाईल, असे महेश जाधव यांनी सांगितले.