कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज यांच्या कृतज्ञता पर्वातील आदरांजली सभेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. महाविकास आघाडीच्या वतीने ही माहिती देण्यात आली. ही सभा शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता शाहू मिल येथे होणार आहे.वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आजी-माजी खासदार, आमदार आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत ही आदरांजली सभा आयोजित केली आहे.लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे एक नाव नाही, तर एक विचार आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेत प्रत्येकाच्या मनात समता, बंधुता रुजवत खऱ्या अर्थाने समाजाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारे ते रयतेचे राजे होते. उद्या, शुक्रवारी (६ मे) शाहू महाराजांची स्मृती शताब्दी साजरी होत असून त्यामध्ये शाहूप्रेमी जनतेने मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन महाविकास आघाडीतर्फे करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, शिवसेनेचे शहरप्रमुख जयवंत हारुगले व काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी त्यासंबंधीचे निवेदन प्रसिद्धीस दिले आहे.पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून व कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पर्वाचाच एक भाग म्हणून शुक्रवारी जिल्ह्यामध्ये सकाळी १० वाजता १०० सेकंद स्तब्धता पाळून लोकराजा शाहू महाराजांना आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे. आदरांजली सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने सर्व तरुण मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना करण्यात आले आहे.
Chhatrapati Shahu Maharaj: शाहू महाराजांना मुख्यमंत्री ऑनलाईन आदरांजली वाहणार, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2022 12:32 PM