कोल्हापूर : तुम्ही आम्हाला गद्दार म्हणता, पन्नास खोके असे हिनवताः पण 'लग्न एकाशी, संसार दुसऱ्याशी, हनिमून तिसऱ्याशी' असा तुमचा व्यवहार होता, अशी बोचरी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
शिवसेनेच्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय महाअधिवेशनाच्या सांगताप्रसंगी ते बोलत होते. महासैनिक दरबार हॉलमध्ये अधिवेशन झाले. त्यास राज्यभरातील नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मूळ विचार जपण्यासाठी आम्ही धाडसी निर्णय घेत वेगळा विचार केला, सन २०१९ मध्ये भाजप, शिवसेना युती करून मते मागितली, सत्ता दुसऱ्यांसोबत स्थापन केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून १५ दिवसांत राज्यात युतीचे सरकार आणण्याचा शब्द दिला. दोन्ही वेळा मोदी आणि भाजपला तुम्ही फसविले. तुम्हीच गद्दार, बेईमान आहात. म्हणून महाराष्ट्राने तुमचा कचरा केला आहे. बाळासाहेबांचे विचार नको; मात्र शिवसेनेच्या खात्यावरचे ५० कोटी हवेत, अशी टीकाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
व्यभिचार केला
• वैचारिक व्यभिचार केला, त्यांना (उद्धव ठाकरे) कायमचं घरी बसवण्याची वेळ आली आहे. ही गर्दीच महायुतीच्या विजयाची नांदी आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संध्याकाळी गांधी मैदानावर झालेल्या जाहीर सभेत बोलताना सांगितले. • बाळासाहेबांचा वारसा सांगताना मनगटात दम असावा लागतो. मातोश्रीवरून बाळासाहेबांची डरकाळी येत होती, तिथून आता रोज रडगाणे सुरू आहे, हे चोरले, ते चोरले, बाळासाहेब चोरायला वस्तू होते का? ते विचार होते, असेही शिंदे म्हणाले.