विकासाच्या आड येणाऱ्या काँग्रेसचा काटाकीर करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे कोल्हापूरी शैलीत आवाहन
By राजाराम लोंढे | Published: April 27, 2024 06:31 PM2024-04-27T18:31:38+5:302024-04-27T18:32:30+5:30
'नेतृत्वहीन काँग्रेसची अवस्था येड्याच्या जत्रासारखी'
कोल्हापूर : नेतृत्वहीन काँग्रेसची अवस्था येड्याच्या जत्रासारखी झाली आहे. कोल्हापूरकर विकासाला साथ देणारे असून विकासाच्या गॅरंटी असणाऱ्या नरेंद्र मोदींच्या मागे ठाम राहणार असल्याचा विश्वास व्यक्त करत ‘विकासाच्या आड येणाऱ्या काँग्रेसचा काटाकीर करा’ असे खास कोल्हापूरी शैलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाहन केले.
महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक व धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ आज, शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरात सुरु असलेल्या विराट सभेत ते बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महापूरासह कोल्हापूरकरांवर आलेल्या विविध संकटावेळी धावून येणारे आम्ही आणि संकटकाळी बाळासाहेब ठाकरे यांना मातोश्रीवर एकटे सोडून फाईव्ह स्टारमध्ये हॉटेलमध्ये जाऊन बसणारे कोठे? ‘उबाठा’ पक्ष शंभर टक्के काँग्रेस झाल्याने ‘नकली’ शिवसेना आहे. आयुष्यभर काँग्रेसविरोधात राहिलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला काय वाटत असेल? त्यामुळे जगाच्या पाठीवर कणखर भूमिका मांडून भारतवासीयांची मान उंचावणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या मागे रहायचे की? देश संकटात असताना परदेशात पळून जाणाऱ्यांच्या सोबत रहायचे हे कोल्हापूरकरांनी ठरवावे.
काँग्रेसच्या उमेदवाराची डिपॉझीट जप्त करा
आईचे दुख विसरुन अखंड दहा वर्षे देशसेवेसाठी वाहून घेणारे नरेंद्र मोदी हे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आईचा पदर धरुन राजकारण करणारे आहेत. अशा काँग्रेसच्या उमेदवाराची डिपॉझीट जप्त करा, असे आवाहनही मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.
ठाकरेंना ‘पंजा’ला मतदान करण्याची वेळ
माझी शिवसेना काँग्रेस होऊ देणार नाही म्हणणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा व नातवाला त्याच काँग्रेसच्या ‘पंजा’ला मतदान करण्याची वेळ आल्याची टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.