कोल्हापूर - लय भारी, कोल्हापूरकरांनो, राम राम..! ही काटा किर्रर गर्दी अन् नाद खुळा उत्साह पाहून विरोधकांचा टांगा पलटी, घोडं फरार व्हायचं नव्हं अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणानं कोल्हापूरकरांना साद घातली. शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शासन आपल्या दारी या उपक्रमाचं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते उद्धाटन झाले. या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपा-शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, तुम्ही विषय लईट हार्ड केलाय, जिकडे बघावे तिकडे गर्दीच गर्दी हाय, आतापर्यंत जेवढे कार्यक्रम, मेळावे झाले त्यापेक्षा आजच्या कार्यक्रमानं सर्वांच्या गर्दीचे रेकॉर्ड ब्रेक आज आपण केलंय. नजर पोहचत नाही तिथपर्यंत माणसं आहेत. कोल्हापूरची जनता या मैदानात प्रेमानं, आपुलकीने आलीय. मी कोल्हापूरकरांना राज्याचा मुख्यमंत्री म्हणून धन्यवाद देतो असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत कोल्हापूरची माती छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शनाने पवित्र झालीय. या मातीने आपल्याला पराक्रम शिकवलाय. कुठलेही संकट कोसळले तरी धाडसी बाणा कोल्हापूरने शिकवलाय. निधड्या छातीचा कोल्हापूरकर सगळ्या संकटाला सामोरे जाऊन यशस्वी होतो. हजारो, लाखो लोक शासन आपल्या दारी कार्यक्रमाला हजेरी लावू लागले. एका छताखाली निर्णय, लाभ, योजना आणि त्यासाठी लागणारी कागदपत्रे देण्याचा निर्णय सरकारने घेतला. सरकारी कामासाठी फार मोठा खटाटोप करावा लागतो. परंतु आपलं सरकार सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे आहे. आतापर्यंत ३०-३५ कॅबिनेट झाल्या त्यात सर्वसामान्यांच्या हितापेक्षा दुसरा कुठलाही निर्णय घेतला नाही असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, मागील अडीच वर्षाच्या काळात एकही सिंचनाचा प्रकल्प मंजूर केला नव्हता. परंतु आपल्या ११ महिन्याच्या काळात २९ सिंचनाच्या प्रकल्पांना मंजुरी देत ६-७ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचा निर्णय सरकारने घेतला. मुलीच्या जन्मापासून ११ वीपर्यंत तिला पैसे देण्याची योजना सरकारने आणली. नमो शेतकरी सन्मान योजनेतंर्गत वर्षाला १२ हजार रुपये शेतकऱ्यांना मिळत आहे. सततच्या पावसामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून १५०० कोटी रुपये देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेतला. शेतकरी केंद्र बिंदू मानून आपण काम करतोय. मागच्या सरकारने जे नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजार अनुदान घेण्याचा निर्णय घेतला परंतु प्रत्यक्षात पैसे जमा झाले नाही. परंतु आपले सरकार येताच हे पैसे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले. महिलांना ५० टक्के दरात एसटी सेवा दिली. ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी प्रवास दिला अशीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली.