कोल्हापूर: कोणतीही निवडणूक हलक्यात घ्यायची नाही. मग ती नगरपालिका, महापालिका, विधानसभा असो किंवा लोकसभा. त्यासाठी कार्यकर्ता म्हणूनच प्रचारात उतरायचे अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कामाची पध्दत आहे. त्यामुळेच ठाणे आणि परिसरावर इतके वर्षे युती, महायुतीचे वर्चस्व आहे. याच भूमिकेतून आपल्याला ज्यांनी बळ दिले अशा लोकसभा उमेदवारांना पाठबळ देण्यासाठी ते कोल्हापुरात येत आहेत. याबद्दल कोणी काही आरोप केले तर त्याकडे लक्ष देण्याची गरज वाटत नसल्याचे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले.ते मंगळवारी कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. शिंदे यांच्या या मुक्कामावर आमदार सतेज पाटील यांनी टीका केली होती. शिंदे म्हणाले, कोल्हापूरवर आम्ही निवडणुकीपुरते प्रेम करणारे नाही. महापूर, कोरोनामध्येही एकनाथ शिंदे यांनी इथे तळ ठोकला होता. येथे फुटबॉल अकादमीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून लवकरच हे काम सुरू होईल. पावनखिंड मार्गावर मुक्कामाच्या सुविधा निर्माण करण्याची शिवभक्तांची मागणी होती. गेली अनेक वर्षे याकडे कोणी लक्ष दिले नाही. परंतू आता या कामाला सुरूवात होत आहे. शहरातील रस्ते, कन्व्हेशन सेंटर, रंकाळा, अंबाबाई तीर्थक्षेत्रासाठी निधी अस महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यामुळे कोणताही भावनिक मुद्दा न करता विकासाच्या कामावर नागरिकांनी मतदान करावे. नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले, याआधीच्या पालकमंत्र्यांनी इथे टोल आणला आणि आम्हांला तो भागवावा लागला. यावेळी धैर्यशील माने, भाजपचे महेश जाधव, विजय जाधव, ऋतुराज क्षीरसागर उपस्थित होते.
असा नेता पाहिला नसल्याने अप्रूपमुख्यमंत्रीपदावर असलेला नेता आपल्या कार्यकर्त्याच्या निवडणुकीसाठी इतका दिवसरात्र राबतो असे चित्र यापूर्वी कधीच कोल्हापूरकरांनी पाहिले नव्हते. त्यामुळे शिंदे यांचा कोल्हापुरातील मुक्काम चर्चेत आल्याचे यावेळी धैर्यशील माने यांनी सांगितले.