कोल्हापूर : मी पॅकेज देणारा नव्हे तर मदत करणारा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे महापुराच्या अस्मानी संकटात कोणत्याही सवंग घोषणा करणार नाही असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
कोल्हापूर-सांगलीतील अनेक लोकांच्या घरातील पूराचे पाणी अजून ओसरलेले नाही, लोक आता कुठे सावरत आहेत. त्यामुळे नुकसानीचा नेमका अंदाज आलेला नसल्याने मदतीची घोषणा केलेली नाही. तातडीची मदत म्हणून दहा हजार रुपये देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.शिरोळ व कोल्हापूर शहरातील पूरग्रस्त भागांस भेट देवून त्यांनी पूरग्रस्तांच्या भावना जाणून घेतल्या. प्रत्येकास त्यांनी धीर दिला. सरकार तुमच्या पाठिशी असल्याचे विश्वास दिला. त्यानंतर शासकीय विश्रामधामवर बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद झाली. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले, महापुरानंतर नुकसानीबध्दल मदत व उपाययोजनांसाठी नक्की किती निधी लागेल यासंबंधीचा अंदाज आम्ही घेत आहोत. त्यामुळे राज्य सरकारने केंद्राकडे अजूनही कोणत्याही मदतीची अथवा रक्कमेची मागणी केली आहे. मी ती लगेच करणारही नाही. गुजरातला एवढे दिले म्हणून आम्हांला इतके हजार कोटी द्या अशी माझी भूमिका नाही.
जेव्हा लागेल तेव्हाच मदत मागू. त्यावेळी मात्र केंद्र सरकारने ती मदत तातडीने द्यावी कारण २०१९ चा महापुरावेळचा अनुभव तसा नाही. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार महापूरातील नुकसानीची भरपाई दिली जाते. परंतू हा कायदा २०१५ चा आहे. त्यास आता सहा वर्षे झाली आहेत. त्यामुळे नुकसानीचे निकष बदलण्याची मागणी नीती आयोगाकडे केली आहे.
महापूर रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना-पर्यात सूचविले जातात,तसाच भिंत घालण्याचा पर्याय पुढे आला होता. हा काय राज्य सरकारने घेतलेला निर्णय नाही. लोकांचा त्याबध्दल आक्षेप असेल तर आम्हीही या पर्यांयाचा विचार करणार नाही असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले.