कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधासाठी मुख्यमंत्री महोदय 'राज्याचे पालक' म्हणून करत असलेल्या कामाची 'प्रेरणा' घेऊनच आम्ही आमचे गाव निश्चितच कोरोनामुक्त करू, असा विश्वास हातकणंगले तालुक्यातील माणगावचे सरपंच राजू आप्पासो मगदूम यांनी व्यक्त केला.
निमित्त होते, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्य कोरोनामुक्त होण्यासाठी सोमवारी राज्यातील सरपंचांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून साधलेल्या संवादाचे.. कोल्हापूर जिल्हा परिषदेमधून मगदूम यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना कोरोना प्रतिबंधासाठी ग्रामपंचायतीच्यावतीने राबविण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी दौलत देसाई (ऑनलाईन), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, कसबा सांगाव (ता. कागल) चे सरपंच रणजित जयसिंग कांबळे उपस्थित होते.
ठाकरे यांनी सरपंच राजू मगदूम यांच्यासह राज्यात 'कोरोनामुक्त गाव' मोहीम प्रभावीपणे राबवित असलेल्या सरपंचांच्या कामाचे कौतुक केले. सरपंच ही राज्याची पाळेमुळे असून, राज्याचा वटवृक्ष बहरण्यासाठी सरपंचांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक गावच्या सरपंचांनी आपापल्या गावचे पालकत्व घेऊन सर्वजण मिळून लवकरात लवकर राज्य कोरोनामुक्त करुया, असे आवाहन यावेळी ठाकरे यांनी केले.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, पहिली लाट ओसरल्यानंतर आपण थोडेसे गाफील राहिलो. त्यामुळे दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागाला मोठा फटका बसला. यावेळी माणगावमध्ये कोरोना रोखण्यासाठी केलेल्या सर्व प्रयत्न, उपक्रम आणि निर्णयांची माहिती मगदूम यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. जिल्ह्यातील तीनही मंत्री, जिल्हा परिषद पदाधिकारी आणि प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांचे चांगले सहकार्य असल्याचे त्यांनी आर्वजून नमूद केले.
कोट
आम्ही ग्रामस्थांच्या पाठबळावर गावात कोरोना रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सविस्तर माहिती घेतली. त्यांनी यावेळी दिलेल्या प्रेरणेमुळे आणखी काम करण्यास बळ मिळाले आहे.
राजू मगदूम, सरपंच, माणगाव
०७०६२०२१ कोल झेडपी ०१
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सोमवारी माणगावचे सरपंच राजू मगदूम यांच्याशी संपर्क साधला आणि कोरोनामुक्तीच्या प्रयत्नांची माहिती घेतली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण आणि कसबा सांगावचे सरपंच रणजित कांबळे उपस्थित होते.