लोकमत आॅनलाईन
कोल्हापूर,दि. २९ : येथील पोलिस मुख्यालय परिसरातील पोलिस उद्यानात देशातील दुसऱ्या क्रमांकाचा व राज्यातील सर्वात उंच राष्ट्रध्वज स्तंभ उभारण्यात आला आहे. या ध्वजस्तंभाचे अनावरण व उद्यानाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या, सोमवारी दूपारी तीन वाजता राजेशाही थाटात होत आहे.
ध्वजस्तंभास मानवंदना देण्यासाठी राष्ट्रपती पुरस्कार विजेते बॉलिवूड अभिनेता ‘रुस्तम’ अक्षय कुमार, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, गृहराज्यमंत्री दिपक केसरकर, पोलिस महासंचालक सतिश माथुर, श्रीमंत छत्रपती शाहु महाराज यांचेसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोलिस उद्यानाची दुरावस्था पाहून त्याचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला. आणि कोल्हापूरला येणारे पर्यटक पोलिसांचे उद्यान पाहून भारावून जातील, अशी रचना करणारा आराखडा तयार करुन उद्यान बनविण्यात आले आहे. उद्यानात देशातील दुसऱ्या क्रमांकाचा ३०३ फूट उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. उद्यान व ध्वजस्तंभासाठी सुमारे एक कोटी खर्च आला आहे. या ध्वजस्तंभाचे अनावरण व उद्यानाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
उद्यान छोटे असल्याने प्रमुख १५० मान्यवरांना उद्दघाटन कार्यक्रमास प्रवेश दिला जाणार आहे. या उत्कृष्ठ आणि देखण्या सोहळ्याचे प्रक्षेपण पोलिस मैदानावर उभ्या करण्यात आलेल्या मंडपामध्ये मोठ्या स्क्रिनवर दाखवले जाणार आहे. या ठिकाणी सुमारे पाच हजार लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कोल्हापूर परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यातील पोलिस बँन्ड या कार्यक्रमाचे आकर्षण असणार आहे. या राजेशाही थाटातील कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे नांगरे-पाटील यांनी सांगितले.
ध्वजस्तंभाची वैशिष्ठे
उद्यानातील प्रशस्त जागेत हा ३०३ फूट उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. वजन २४ टन, ध्वजस्तंभाचा बेस ५ फूट, तिरंगा ध्वज ९0 फूट लांब व साठ फूट रूंद म्हणजे ५४00 चौरस फुटांचा आहे. उंचावरील वाऱ्याच्या झोताने ध्वजाचे नुकसान होऊ नये म्हणून त्यासाठी स्पेशल पॉलिस्टर पॅराशुट फॅब्रिक्सचे कापड वापरले आहे. त्यामुळे शहराच्या कोणत्याही भागातून या स्तंभावर फडकणारा तिरंगा लक्ष वेधून घेणार आहे. तो चौवीस तास विद्युत रोषणाईच्या झोतात फडकणार आहे. त्यासाठी स्वतंत्र जनरेटरची सोय केली आहे. ध्वजसंहिता नियमानुसार त्याची तंतोतंद अंमलबजावणी केली जाणार आहे. उद्यान व ध्वजस्तंभाच्या देखभाल दूरस्तीसाठी सात कर्मचाऱ्यारी ठेवले जातील. दोन पोलिस शिपाई चौवीस तास पहारा देतील. याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना माहिती सांगण्यासाठी प्रशिक्षक (गाईड) ठेवला जाणार आहे. या ध्वजस्तंभाचा महिना ७० हजार रुपये दूरुस्ती खर्च आहे.
उद्यानाची वैशिष्ठे
सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस प्रशिक्षण संस्थेच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती.
राष्ट्रीय चिन्ह-चार सिंहाची प्रतिकृती
तिरंग्याच्या रंगाचे महत्व सांगणारे २४ बाय १५ फूट लांबी-रुंदीचे भित्तीचित्र(म्युरल्स)
सेल्फी स्पॉट
वीस फूट व्यासाचा भव्य कारंजा व लाईट इफेक्टस
कोल्हापूरातील पहिले पोलिस प्रशिक्षणावर आधारित एॅडव्हेंचर पार्क
स्वातंत्र्य लढा (१८५७ ते १९४७) वर आधारित भव्य प्रदर्शन
‘जयगान’ संपूर्ण उद्यानात लावलेले स्वातंत्र्य सैनिकांचे विचार व माहिती
देशी व विदेशी अनोखी फुलझाडे वाहतूक प्रशिक्षण,
शस्त्रे व पोशाख प्रदर्शन ३०३ फूट उंचीचा राज्यातील सर्वोच्च व देशातील दूसऱ्या क्रमांकाचा राष्ट्रध्वज
. ‘मराठी तारका’ सांस्कृतिक कार्यक्रम
ध्वजस्तंभाचे अनावरण व उद्यानाचे उद्घाटन कार्यक्रमानंतर सायंकाळी साडेसहा वाजता पोलिस कवायत मैदानावर पोलिस कल्याण निधी संंकलनासाठी ‘मराठी तारका’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजित केले आहे. या कार्यक्रमास मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर, भार्गवी चिरमुले, हेमांगी कवी, स्मिता शेवाळे, तेजा देवकर, श्वेता शिंदे, केतकी पालव, वैष्णवी पाटील, मीरा जोशी, आदिती घोलप, मराठी सारेगमफेम कार्तिकी गायकवाड, हिंदु सारेगमाफेम अरूरिमा, हास्यसम्राट डॉ. दीपक देशपांडे, विश्वजित बोरवणकर, अतुल तोंडनकर, प्रसिद्ध सूत्रसंचालक प्रियदर्शन जाधव आदी कलाकार उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाची तयारीही पोलिस प्रशासनाने जय्यत केली आहे. सुमारे वीस हजार लोक उपस्थित राहतील असा अंदाज आहे.
मदतीचे आवाहन
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांनी शहीद सैनिकांसाठी ‘भारत के वीर’ अॅप बनविले आहे. दहा दिवसात शहीद सैनिकांच्या कुटूंबियांच्या मदतीसाठी सहा कोटी रुपये जमा झाले. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे ध्वजस्तंभ अनावरण कार्यक्रमात एक लाखाचा धनादेश अक्षय कुमार यांना देणार आहेत. कोल्हापूरातील दानशुर व्यक्तिंनी सरहद्दीवर लढणाऱ्या सैनिकांच्या कुटूंबियांसाठी धनादेशाद्वारे आर्थिक मदत करावी, असे आवाहन नांगरे-पाटील यांनी केले आहे.