कोल्हापूर : जिल्ह्यातील १०पैकी ९ जागांवर महायुतीचे उमेदवार निश्चित असून केवळ ‘कोल्हापूर उत्तर’बाबत घोळ सुरू असल्याचे सांगण्यात आले. जोपर्यंत शिंदेसेनेची यादी जाहीर होत नाही तोपर्यंत ही जागा चर्चेत राहणार आहे. दरम्यान खासदार धनंजय महाडिक यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याच्या बातम्या झळकल्या. परंतु महाडिक यांनी आपण ‘वर्षावर’ गेलो नव्हतो तर दिवसभर पक्षाच्या बैठकीत होतो असे स्पष्ट केले. ‘उत्तर’चे इच्छुक भाजपचे सत्यजित कदम यांनीही मुंबईतच तळ ठोकला आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मात्र आपले मेळावे सुरू केले आहेत.जिल्ह्यातील महायुतीच्या उत्तर वगळता कोणाच्याही उमेदवारीबाबत साशंकता नाही. उत्तरचे संभाव्य उमेदवार क्षीरसागर यांनी कोल्हापूरमध्ये भेटीगाठींचे सत्र सुरू ठेवले असून मेळाव्यांनाही सुरुवात केली आहे. खासदार धनंजय महाडिक हे सत्यजित कदम यांच्यासह मुंबईत तळ ठोकून आहेत. मात्र महाडिक यांनी कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यांच्या चर्चेसाठी पक्षाच्या बैठकीतच दिवसभर असल्याचे स्पष्ट केले आहे. महाडिक हे मुलगा कृष्णराजसाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा रंगली. परंतु त्यात तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले.
कदम यांच्या भूमिकेकडे लक्षमहापालिकेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे कार्यरत असलेले सत्यजित कदम यांनी याआधी काँग्रेस आणि भाजपतर्फे विधासभा निवडणूक लढवली आहे. पोटनिवडणुकीतील पराभवानंतर तर त्यांनी अधिक सक्रिय होत अनेक कामे मंजूर करून आणली. त्यामुळे कोणत्याही स्थितीत थांबायचे नाही अशी त्यांची मानसिकता दिसते. त्यामुळे ते उमेदवारी मिळाली नाही तर ‘वेगळा’ विचार करण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे.