कोल्हापूर : जिल्ह्यातील पंचगंगा नदी प्रदूषणाचा विषय गंभीर आहे. त्याची दाहकता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर लवकरच मांडली जाईल, अशी ग्वाही ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. तर अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा आणि नगरोत्थानमधून रस्त्यांसाठीच्या निधीचा विषय मार्गी लावू, असे आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले.
कोल्हापूर जिल्ह्याच्या विविध समस्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार (दि.१६) मार्च रोजी कोल्हापूर जिल्ह्याची आढावा बैठक विधान भवन येथे होत आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकासमंत्री मुश्रीफ, पालकमंत्री पाटील आणि सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील -यड्रावकर यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी खासदार प्रा. संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार सर्वश्री चंद्रकांत जाधव, प्रकाश आवाडे, राजेश पाटील, प्रकाश आबिटकर, ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांसमोर जिल्ह्यातील विकासाचे महत्त्वाचे प्रश्न निश्चितपणे मांडले जातील, असे मुश्रीफ यावेळी म्हणाले. त्याचबरोबर अपूर्ण प्रकल्पांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी. पुनर्वसनाबाबत निर्णय घ्यावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.
अपूर्ण प्रकल्पांबाबत एक एक प्रकल्पाचा विषय घेऊन बैठक लावू. शिवभोजन ही योजना तालुकास्तरावर राबविण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करू. शाहू मिल येथील स्मारकाचा विषय मार्गीलावण्यासाठी अर्थमंत्र्यांकडे प्रयत्न करू. अंबाबाई तीर्थ क्षेत्र आराखड्याबाबत यावर्षी २५ कोटींच्या निधीसाठी त्याचबरोबरच नगरोत्थानमधून रस्त्यांसाठी १७८ कोटी निधीसाठी प्रयत्न केला जाईल.- सतेज पाटील, पालकमंत्री