कोल्हापूर : मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० जुलैपर्यंत बैठक लावावी, अन्यथा या प्रश्नी क्रांतिदिनी नऊ आॅगस्टला कोल्हापूर जिल्हा बंद करू, असा इशारा मराठा क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पाटील यांनी कोल्हापुरात दिला.ते मराठा क्रांती संघटनेच्यावतीने आयोजित केलेल्या बेरोजगार युवक मेळाव्यात शिवाजी मंदिर येथे बोलत होते. जिल्हाध्यक्ष परेश भोसले अध्यक्षस्थानी होते. यावेळी मराठा क्रांती संघटनेची जिल्हा व शहर कार्यकारिणी पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर झाली.सुरेश पाटील म्हणाले, गेली १५ वर्षे मराठा समाज आरक्षण मागत आहे. हा आरक्षणाचा लढा सुरू आहे. काँग्रेस आघाडीच्या काळात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. राणे यांनी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण द्यावे, असे अहवालात सांगितले. परंतु, या प्रश्नी जनहित याचिका दाखल झाली; त्यामुळे न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली.
२०१४ ला भाजप-शिवसेनेला मराठा समाजाने या प्रश्नी साथ दिली. सत्ताधारी भाजप-शिवसेना सरकारने मराठा आरक्षणाचे सात ते आठ जी. आर. काढले; मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आणि आरक्षण मिळावे, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर ३० जुलैपर्यंत बैठक लावावी, अन्यथा नऊ आॅगस्टला जिल्हा बंद करू, असा इशारा सुरेश पाटील यांनी यावेळी दिला.यावेळी माजी नगरसेवक रवी इंगवले म्हणाले, मराठ्यांना आरक्षण दिले पाहिजे; पण इतर समाजातील धर्मांवर व जातींवर अन्याय होणार नाही, याची दखल राज्य सरकारने घेतली पाहिजे. याप्रसंगी मराठा क्रांती संघटनेची जिल्हा व शहर कार्यकारिणी जाहीर झाली. शहराध्यक्ष म्हणून राहुल इंगवले यांची निवड झाली.मेळाव्यास भरत पाटील, चंद्रकांत पाटील, मोहन मालवणकर, संतोष कांदेकर, अमोल कल्याणकर, सुनीता पाटील, नितीन पाटील, पुष्कर पाटील, निरंजन पाटील यांच्यासह युवक उपस्थित होते.मागण्या...
- आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या कर्जासाठीच्या जाचक अटी रद्द कराव्यात व विनाअट कर्ज द्यावे.
- प्रत्येक जिल्ह्यात मराठा वसतिगृह उभारण्यात यावे.
- बेरोजगार तरुण-तरुणींना बेरोजगार भत्ता वाढवून देण्यात यावा.