कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची घोषणा करणारे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचे बंड थंड करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आले. शनिवारी (दि.१३) मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही निवडणूक लढवणार असल्याचे आवडेंनी सांगितले होते. मात्र आज, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आवडेंचे बंड शमले. यानंतर महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते मुख्यमंत्र्यांसोबत गेले.प्रकाश आवाडे यांच्या घरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शंभूराज देसाई, रामदास कदम यांच्यासह पोहोचले. यावेळी प्रकाश आवाडे यांच्याशी चर्चा करत यांची मनधरणी केली. अन् अखेर त्याला यश आले. यानंतर मुख्यमंत्री शिंदे आवाडे यांना सोबत घेऊनच माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेले. धैर्यशील माने यांच्या उमेदवारीला आवाडे यांनी उघड विरोध केला होता. उमेदवार बदलण्याची थेट मागणी देखील केली होती. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. यासर्व घडामोडीनंतर आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे यांनी लोकसभा लढणार असल्याची घोषणा केली होती. मात्र सर्व्हेनुसार प्रकाश आवाडेंना पसंती असल्याचे समोर आल्याने प्रकाश आवडेंनी निवडणूक रिंगणात शड्डू ठोकला होता. आवाडे हातकणंगलेमधून उभे राहिले असते तर मतविभागणामुळे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना धोका होता. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर दौऱ्यादरम्यान जोडण्या लावल्या. शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, जनसुराज्य आमदार विनय कोरे यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाडे यांची मनधरणी करण्यात यश आल्याने माने यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुख्यमंत्र्यांनी प्रकाश आवाडेंचं बंड थंड केले, धैर्यशील मानेंचा अर्ज भरायला सोबत घेऊन गेले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 2:15 PM