एका उमद्या सहकाऱ्याचे असे निघून जाणे क्लेशदायक, मुख्यमंत्र्यांनी आमदार जाधव यांना वाहिली श्रध्दांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2021 12:16 PM2021-12-02T12:16:35+5:302021-12-02T12:27:25+5:30
मुळचे खेळाडू असलेल्या आमदार जाधव यांनी खिलाडूवृत्तीने आपली वाटचाल केली. त्यामध्ये उद्योजकता आणि राजकारण यांचा समतोल सांभाळला.
कोल्हापूर : काँग्रेसचेकोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव (अण्णा) यांचे आज, गुरुवारी पहाटे निधन झाले. आमदार जाधव यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.
मुळचे खेळाडू असलेल्या आमदार जाधव यांनी खिलाडूवृत्तीने आपली वाटचाल केली. त्यामध्ये उद्योजकता आणि राजकारण यांचा समतोल सांभाळला. विधीमंडळातील एका उमद्या सहकाऱ्याचे असे अवेळी निघून जाणे क्लेशदायक आहे. जाधव यांच्या कुटुंबियांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळावी, ही ईश्वरचरणी प्रार्थना. अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आमदार जाधव यांना श्रद्धांजली वाहिली.
तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रिय नेतृत्व, जनतेशी घट्ट नाळ असलेला लोकप्रतिनिधी, विधिमंडळातील अभ्यासू सहकारी, जिल्ह्यातलं क्रीडाप्रेमी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. त्यांचं निधन ही महाविकास आघाडीची मोठी हानी आहे. मी आणि आम्ही सर्वजण जाधव कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत. अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.
आमदार चंद्रकांत जाधव यांच्यावर गेल्या काही दिवसापासून हैदराबादमध्ये खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांचा प्राणज्योत मालावली. त्यांचे पार्थिव दुपारी एक वाजेपर्यंत कोल्हापुरात आणण्यात येणार आहे.
2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकटावर निवडून आले होते. एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांनी कोल्हापूरच्या उद्योग जगतात नावालौकिक मिळावीला होता. पूर्वाश्रमीचे फुटबॉल खेळाडू, फुटबॉलखेळाचा पाठीराखा म्हणून त्यांची ओळख होती. साधी राहणी आणि लोकात मिसळण्याचा स्वभावामुळे ते लोकप्रिय होते.