कोल्हापूर: ज्यांना शेतीतले कळत नव्हते, त्यांनी २०१९च्या महापुरात मदत केली, पण आता सगळं कळतंय तरी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जात आहे. जुने निकष लावून जाहीर होणाऱ्या मदतीचे आकडे पाहिले तर मुख्यमंत्र्यांकडून पूरग्रस्तांची कुचेष्टाच झाली आहे, अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी केली. सरकारला जाब विचारण्यासाठी येत्या २३ ऑगस्टला पूरग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देतील, असेही त्यांनी जाहीर केले.
जिल्ह्यात महापुराने झालेली हानी आणि सरकारच्या मदतीच्या निकषावरून पूरग्रस्तांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी पूरग्रस्तांचा आवाज ‘स्वाभिमानी’च्या झेंड्याखाली एकत्र करण्यासाठी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. त्याची सविस्तर माहिती शुक्रवारी कोल्हापुरात पत्रकार बैठकीत दिली. २३ ला दुपारी १ वाजता दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात होणार आहे. पूरग्रस्त शेतकरी, ग्रामस्थ, व्यापारी, यंत्रमागधारक यात सहभागी होणार आहेत. यावेळी प्रा. जालंदर पाटील, सावकर मादनाईक, राजेंद्र गड्यानवर, जनार्दन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
शेट्टी म्हणाले, यावेळच्या महापुराने २०१९ पेक्षाही जास्त नुकसान केले आहे. शेती, उद्योग उद्ध्वस्त झाला आहे, त्यांना उभारी देण्यासाठी भरीव मदतीची अपेक्षा होती. महापूर पाहणी दौऱ्यावेळी आलेल्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासह इतर मंत्र्यांनीही भरीव मदतीचे आश्वासन दिले होते, पण प्रत्यक्षात हातात काहीही पडलेले नाही.
चौकट
काडीकचऱ्याचा खर्चही निघणार नाही
मंत्रालयातून माहिती घेतली असताना शेतकऱ्यांच्या वाट्याला ५०० ते ६०० कोटी रुपयेच येणार आहेत. रक्कम कमी असल्याने २०१५ चा निकषांनुसार त्यांचे वाटप होणार आहे. यातील निकष पाहता ३३ टक्के नुकसानीसह उसाला प्रतिएकर ५ हजार ४०० रुपये मिळणार आहेत झालेले नुकसान पाहिले तर शेतातील कुजलेले काडसार बाहेर काढण्याचाही खर्च निघणार नाही, असे शेट्टी यांनी सांगितले.
मोर्चातील प्रमुख मागण्या
पूरग्रस्तांची पीक कर्जमाफी करावी
कोल्हापूर व सांगलीतील १०३ पुलांच्या बाजूचा भराव काढून कमालीचे पूल बांधावेत
नियमित कर्जदारांना ५० हजाराचे सानुग्रह अनुदान द्यावे
पूरपट्ट्यातील घरांचे गायरानात विनाअट पुनर्वसन करावे
विद्यार्थ्यांची शालेय फी माफ करावी
कृष्णा उपनद्या पूर अभ्यासगट नेमावा
अलमट्टी पाणीपातळी ५०९ मीटरपर्यंत स्थिर ठेवावी