कोल्हापूर : आजरा साखर कारखाना कोणत्याही परिस्थितीत चालू झाला पाहिजे. त्यामध्ये तुमची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे तुम्ही जातीने यामध्ये लक्ष घाला. तुम्ही अध्यक्ष असलेल्या जिल्हा बँकेकडून मदत झाली पाहिजे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे व्यक्त केली. कारखाना संचालिका अंजना रेडेकर यांनी ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली.मुश्रीफ यांनी मंगळवारी ठाकरे यांची वेळ मागितली असून त्यावेळी वस्तुस्थिती स्पष्ट करतो, असे सांगितले आहे. जिल्हा बँकेच्या सहकार्याशिवाय आजरा कारखाना सुरू होणे अशक्य आहे. मुश्रीफ यांनी या महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात बँकेच्या ताळेबंदावर परिणाम करून काही करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे कारखाना सुरू होण्याची शक्यता धूसर झाली होती.
कारखान्याचे अध्यक्ष सुनील शिंत्रे यांनी प्रयत्न थांबविलेले नाहीत. त्याचाच भाग म्हणून संचालिका रेडेकर यांनी शुक्रवारी सायंकाळी वर्षा निवासस्थानी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी स्थानिक नगरसेविका रंजना शिंत्रे उपस्थित होत्या. रेडेकर यांनी मुख्यमंत्र्यांना कारखान्याची वस्तुस्थिती सांगितली. जिल्हा बँकेने सहकार्य केल्यास कारखाना सुरू होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यावर लगेचच ठाकरे यांनी मुश्रीफ यांना फोन लावला. या कामामध्ये तुम्ही मदत करा, अशी सूचना केली.थकहमी दिली आहे कायावेळी रेडेकर यांच्यशी चर्चा करताना एनपीएमध्ये गेलेल्या साखर कारखान्यांना शासनाने थकहमी दिली आहे का, याची खात्री मुख्यमंत्र्यांनी करून घेतली. अशा दोन कारखान्यांना थकहमी दिल्यााचे स्पष्ट झाल्यामुळे आजरा साखर कारखान्यासाठीही ठाकरे आणि मुश्रीफ काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.सतेज पाटील यांनाही आग्रहएकीकडे हे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे कामगार संघटना पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळी पालकमंत्री सतेज पाटील यांचीही भेट घेतल्याचे समजते. कारखाना स्वबळावर चालविण्यास अडचणी आल्या तर किमान सतेज पाटील यांच्या डॉ. डी. वाय. पाटील कारखान्याने तो चालविण्यासाठी घ्यावा, असा त्यांना आग्रह असल्याचे समजते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आजरा साखर कारखान्याबाबत मला फोन आला होता. मी त्यांच्याकडे मंगळवारची वेळ मागितली आहे. त्यावेळी या विषयावर सविस्तर बोलणार आहे.-हसन मुश्रीफग्रामविकास मंत्री