पाणी ओसरण्याची गती अत्यंत कमी असल्याने चिखली गावाला मंगळवारी दुपारपर्यंत बेटाचे स्वरूप होते. मंगळवारी सायंकाळी चिखलीच्या मुख्य रस्त्यावरील पुराचे पाणी पूर्णपणे ओसरले. दरम्यान गुऱ्हाळघराचे जळण गंजी (बडमी) पाण्याने वाहून रस्त्यावर आली होती. गावातील इतर रस्त्यांवरही पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून आलेले साहित्य व झाडे ग्रामपंचायत तसेच आमदार पी. एन. पाटील यांनी उपलब्ध करून दिलेल्या जेसीबी मशीनद्वारे रस्त्यावरून हटविण्यात आली. येथील ‘गोकुळ’चे संचालक एस. आर. पाटील यांच्या पुढाकाराने शाहू माळ परिसरातील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविण्यात आले.
गट-तट विसरून, खांद्याला खांदा लावून पुरामुळे नुकसान झालेल्या ग्रामस्थांच्या सोयीसाठी ‘गोकुळ’चे संचालक एस. आर. पाटील, रघुनाथ पाटील, भाजपचे संभाजीराव पाटील, माजी सरपंच केवलसिंग रजपूत, धनाजी चौगले यांनी परिश्रम घेतले.
गावातील घरादारांमध्ये चौकाचौकांमध्ये दुर्गंधी सुटलेली असली तरी गावातील तरुण, युवक कार्यकर्ते तसेच स्थानिक नेते यांनी संपूर्ण गावस्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला असून, तसे नियोजन ग्रामपातळीवर चालू आहे.
पावसाळा अजूनही शिल्लक असल्यामुळे महापुराचे संकट पुन्हा येऊ शकते याची शक्यता गृहीत धरून शासन व ग्रामपंचायतीने स्थलांतरित ग्रामस्थांनी महापुराचा धोका ओळखून स्थलांतरित ठिकाणी काही दिवस वास्तव्य करावे असे आवाहन केले आहे. या आवाहनाला स्थलांतरित ग्रामस्थांतून प्रतिसाद मिळत आहे.
चौकट -
दरम्यान, महापुराच्या महासंकटाचा फटका बसलेल्या ग्रामस्थांना अभय देण्यासाठी गावातील नेतेमंडळी गट-तट विसरून लोकांचे संसार पुन्हा उभारण्यासाठी यंत्रणा राबवीत असल्याचे चित्र दिसत आहे.
फोटो ओळी :- प्रयाग चिखली (ता. करवीर) येथील मुख्य रस्त्यावर अडकलेली गुऱ्हाळाची गंजी हटवितानाचे छायाचित्र.