मुरगूड : मुरगूड (ता. कागल) येथे मराठी साहित्य संमेलन समिती, मुरगूड आणि मराठी बालकुमार साहित्य सभा, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित विभागीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या शेवटच्या सत्रात आयोजित परिसवांद, कथाकथन, काव्यवाचन, आदी कार्यक्रमांत प्रसिद्ध बालसाहित्यिकांबरोबर चिमुरड्यांचा प्रतिसाद लाभला. श्रीपाद जोशी साहित्यनगरीमध्ये शहरासह भागातील विविध शाळेमधील शेकडो बालकांनी हजेरी लावत कार्यक्रमांना दाद दिली.उद्घाटनाचे सत्र पार पडल्यानंतर ‘जंगलानुभव’ या विषयावर परिसवांद रंगला. यामध्ये निसर्ग, पशुपक्षी, जंगल आणि गडकोट अभ्यासक डी. के. मोरसे यांनी व्यासपीठावर साक्षात जंगल उभा केला. निवेदक बाळ पोतदार, एम. डी. रावण यांनी विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्न विचारून परिसंवादात रंगत आणली. मोरसे यांनी जंगल सफारीमधील विविध प्रसंग सांगत प्राणी, पक्षी परीक्षण करण्याच्या पद्धती मुलांसमोर उभा केल्या. यानंतर कथाकथनकार गोविंद गोडबोले याच्या अध्यक्षतेखाली कथाकथन पार पडले. गाजलेल्या कथाकारांबरोबर चिमुरड्या लेखकांनी सादर केलेल्या कथा दाद घेऊन गेल्या. यावेळी कथाकार मा. ग. गुरव, शाम कुरळे यांनीही कथा सादर करून कार्रक्रमात रंगत आणली. मुरगूड विद्यालयाचे प्राचार्य पी. व्ही. शिंदे, महादेव कानकेकर, व्ही. आर. भोसले, गर्ल्स हायस्कू लच्या खामकर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने उंची गाठली. शेवटच्या सत्रात काव्यवाचनात मनोहर मोहिते, दिप्ती कुलकर्णी, स्नेह वाबळे, अश्विनी गुरव, सदाशिव कुंभार, राम कुंभार, आदींनी कविता सादर केल्या.संमेलन पार पाडण्यासाठी एम. डी. रावण, बबन बारदेस्कर, प्रवीण दाभोळे, चंद्रकांत माळवदे, पांडुरंग सारंग, शिवाजीराव होडगे, भैरवनाथ डवरी, जयवंत हावळ, शशी दरेकर, बी. एस. खामकर,पी. आर. पाटील, आदींनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)
मुरगूडमध्ये बालसाहित्यिकांची मांदियाळी
By admin | Published: March 01, 2017 1:02 AM