किणी : बाल साहित्य दिशा दिग्दर्शनाचे काम करीत असून, हे साहित्य बालकांचे मन समृद्ध करते. बालकांची उद्याची दुनिया समृद्ध करण्यासाठी अशा साहित्य संमेलनाची गरज आहे, असे प्रतिपादन प्रवचनकार प्रा. शिवाजीराव भुकेले यांनी केले.किणी (ता. हातकणंगले) येथे जिनेंद्र क्रिएशन व मराठी बालकुमार साहित्य सभा, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने बारावे मराठी बालसाहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रा. शिवाजीराव भुकेले यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. मा. ग. गुरव होते. यावेळी सभेचे अध्यक्ष गोविंद गोडबोले हाते.प्रा. भुकेले म्हणाले, जगातील सर्वांत अवघड साहित्यिक प्रकार हा बाल साहित्य आहे. या साहित्याकडे हजारो नजरा असतात. त्यामुळे बालकांची समृद्धता वाढविण्यासाठी या साहित्याचा उपयोग होतो. बालकांना लहानपणापासून पुस्तकाशी मैत्री करायला शिकविले पाहिजे. कथाकार, नाटककार, कवी अशा संमेलनातूनच निर्माण होतील. निष्ठावंत वर्ग साहित्यातून निर्माण होईल, अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली.डॉ. मा. ग. गुरव म्हणाले, आज घरात आणि बाहेरही मुक्त संवाद कमी होत चालला आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांशी बालकांची मैत्री घट्ट होताना दिसत असून, त्याचे दुष्परिणाम तपासून पाहिले पाहिजेत. बालसाहित्यास गती मिळण्यासाठी बालक, पालक, शिक्षक याचबरोबर साहित्यिकांनी मेहनतीने काम करणे गरजेचे आहे. बालसाहित्यातून बिजे रुजविली जातील. ग्रामीण भागातील हे नववे संमेलन आहे याचा अभिमान असून, मिळालेला प्रतिसाद पाहता संमेलन यशस्वी झाले, असे म्हणावे लागेल.गोविंद गोडबोले म्हणाले, या संमेलनामुळे बालक यशवंत, गुणवंत होतील, वाचन संस्कृती वाढेल, तर साहित्यिक ग्रामीण भागातून निर्माण होऊन संमेलन यशस्वी होतील. त्यांनी संवाद साधत विद्यार्थ्यांनाही बोलते केले.स्वागत अध्यक्ष राजकुमार चौगुले म्हणाले, साहित्य हे संवाद साधण्याचे प्रभावी साधन असून, ज्ञानात भर घालण्यासाठी व जगण्याचे बळ देण्यासाठी साहित्य उपयोगी पडते. या संमेलनानिमित्त आयोजित ग्रंथदिंडी सोहळ्यात विविध मान्यवरांसह शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. फुलांनी सजविलेली ही ग्रंथदिंडी संमेलनाचे खास आकर्षण ठरली.यावेळी दहावीत मराठी विषयात शंभरपैकी शंभर गुण मिळविणारी मजले हायस्कूलची कु. नेहा पाटील व राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार प्राप्त डॉ. श्रीकांत पाटील यांना गौरविण्यात आले.प्रभंजन चौगुले यांच्या तंत्र अभ्यासाचे, माती आभाळाशी बोले (डॉ. श्रीकांत पाटील), चिमुकल्यांच्या कविता (अनिकेत सुतार), शिदोरी (मनोहर मोहिते), या साहित्याचे प्रकाशन झाले. काव्यसत्रात शाम कुरळे, रमेश इंगवले, श्रृतिका पाटील, अपूर्वा नलवडे, प्रथमेश शेळके, स्नेहल माळी, प्रज्ञा जोशी, नंदिनी पाटील, आदी बालकांनी भाग घेतला.यावेळी कार्यवाह अशोक पाटील, बाळ पोतदार, डॉ. श्रीकांत पाटील यांची भाषणे व कथाकथन झाले. स्वस्तिक माळी यांनी सूत्रसंचालन केले. उमेश देवकर यांनी आभार मानले.दरम्यान, गावातील प्रमुख मार्गांवरून विविध वाद्यांच्या गजरात ग्रंथदिंडी पार पडली. यावेळी साहित्यिक क्षेत्रासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)
बाल साहित्य दिशादर्शक
By admin | Published: November 17, 2014 11:47 PM