कोल्हापूर : गेल्या दोन वर्षात जिल्ह्यातील ५२ अल्पवयीन मुलींचे विवाह रोखण्यात यंत्रणेला यश आले आहे. जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण विभाग, चाईल्ड लाईन, बालकल्याण समिती, ग्रामीण भागातील पोलीस पाटील, ग्रामसेवक अशा वेगवेगळ्या यंत्रणांनी माहिती मिळताच कारवाईचा बडगा उगारल्याने बालविवाह वेळीच रोखले गेले. पण शासन वारंवार ओरडून सांगत असतानादेखील लोकांची बालविवाहाची मानसिकता बदलत नाही, हेच मोठे दुर्दैव म्हणावे लागेल.
मुलगा, मुलगी सज्ञान झाल्याशिवाय त्यांचा विवाह करू नये, हा कायदा आहे. पण तरीही या कायद्याला न जुमानता जिल्ह्यात राजरोसपणे बालविवाह केले जातात. याचे प्रमाण शहरीपेक्षा ग्रामीण भागात जास्त आहे. अनेकदा ज्या कुटुंबात लग्न आहे, त्यांचे शेजारी, आप्तेष्ट, नातेवाईकांकडून ही माहिती स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिली जाते. चाईल्ड लाईनला तक्रार केली जाते. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत ५२ मुलींचे बालविवाह रोखण्यात यंत्रणेला यश आले आहे. कायद्याचा बडगा असला तरी, मुलीची शारीरिक व बौद्धिक वाढ याचा विचार करून पालकांनी बालविवाहासारख्या कुप्रथांना बळी पडू नये. पण आजही सर्रास बालविवाह केले जातात. कोरोना आणि लॉकडाऊननंतर तर यात अधिकच भर पडली आहे.
वधूचे वय १८, तर वराचे वय २१ हवे
विवाहासाठी मुलीचे वय १८, तर मुलाचे वय २१ असणे गरजेचे आहे. या वयात त्यांचा पूर्णत: शारीरिक व बौद्धिक विकास झालेला असतो. त्यामुळे वैवाहिक जीवनात अडथळे येत नाहीत. याबाबत शासनाने वारंवार जागृती केल्यानंतरदेखील बालविवाहांचे प्रमाण वाढले आहे. त्यासोबतच ते उघड होण्याचे प्रमाणही वाढले आहे.
बालविवाह रोखण्यासाठी येथे करा संपर्क...
आपल्या परिसरात बालविवाह होत असल्याचे लक्षात आल्यास स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये आपले नाव न सांगता याबाबतची माहिती देऊ शकता किंवा चाईल्ड लाईनच्या १०९८ या क्रमांकावर संपर्क साधू शकता. बालकल्याण समिती, जिल्हा परिषदेचा महिला व बालकल्याण विभाग, ग्रामीण भागातील पोलीस पाटील, ग्रामसेवक यांना माहिती देऊ शकता.
महिना : सन २०२० : सन २०२१
जानेवारी : १ : १
फेब्रुवारी : ० : २
मार्च : १ : ३
एप्रिल : १ : ३
मे : ४ : ३
जून : ३ : ५
जुलै : ४ : ७
ऑगस्ट : ३ : ४
सप्टेंबर : २ : २
ऑक्टोबर : १ : १
नोव्हेंबर : ० : २
डिसेंबर : ० : अजून सुरू