सातारा : सातारा शहरातील नगरपालिकेचे पोहण्याचा तलाव यंदाही सुरू होणार नसल्याची कुणकुण लागल्यानंतर धोका पत्करून मुलांचे पाण्यातील खेळ सुरू झाले आहेत. तलाव बंद असल्याने अनेक मुलं या परिसरातील कॅनॉल, नदी, विहीर व तलावात पोहण्यासाठी जात आहेत. या ठिकाणी सुरक्षिततेचे कोणतेच साधन उपलब्ध नसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना गत सप्ताहापासून सुट्या लागल्या आहेत. या सुट्यांमध्ये काहीतरी धम्माल करण्याची उर्मी असलेल्या या विद्यार्थ्यांना परिसरातील पाणी खुणावत आहे. पूर्वी सातारा नगरपालिकेचे पोहण्याचे तलाव खुले करण्यात येत असल्याने येथे शहरातील मुले आणि मुली दोन स्वतंत्र बॅचमध्ये मोठ्या संख्येने पोहण्यासाठी येत होते. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून जुन्या नगरपालिका शेजारी असलेला पालिकेचा एकमेव पोहण्याचा तलाव बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील अन्य खर्चीक तलावांवर पोहायला जाण्यापेक्षा शहरालगत असलेल्या पाण्याच्या ठिकाणी जाण्यास ही मुलं प्राधान्य देत आहेत. घरातून खाऊचा डबा घेऊन मनसोक्त पोहल्यानंतर जवळपास झाड बघून थोडा डुलका काढून मग ही मुलं संध्याकाळी घरी परतत आहेत. साताऱ्यातील मागील दोन आठवड्यांत ३८ ते ४० अंश सेल्सिअस पारा झाला आहे. त्यामुळे उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या कारणास्तव उन्हात इतर खेळ खेळण्यासाठी सहसा कोणीच सापडत नसल्याने लहान मुलांनी पोहण्याकडे आपला मोर्चा वळविला आहे. त्यामुळे सध्या फुटके तलाव, गोडोली तळे, कण्हेर कॅनॉल, विहिरी, कृष्णा नदी येथे मुलांच्या संख्येत वाढ होत आहे.सध्या नदीला पाणी कमी असले तरी तळ्यांना व विहिरींना पाणी अधिक चांगले आहे. यांची खोलीही अधिक आहे. अनेक लहान मुले एकमेकांचे पाहून या डोहात उड्या टाकत असल्याने एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालकांना सांगून किंवा काहीदा त्यांना न सांगता आलेल्या या मुलांचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. चुकून काही दुर्घटना घडलीच तर या मुलांना तातडीने मदत उपलब्ध करून देणे आणि त्यांचा प्राण वाचविणे याविषयी ही मुलं गंभीर नाहीत. पाण्यात खेळत असताना परस्परांबरोबर दंगा करणे, पोहायला न येणाऱ्याला बळजबरीने ढकलण्याचा प्रयत्नही केला जात असल्याचे चित्र पाहायला मिळते. पोहण्यातील या संभाव्य धोक्यांची जाणीव पालकांसह विद्यार्थ्यांनाही असणे अपेक्षित आहे. (प्रतिनिधी) ही आहेत धोक्याची ठिकाणं...!गतवर्षी कण्हेर डाव्या कालव्यात कपडे धुवायला आलेल्या सख्ख्या तीन बहीण-भावांचा मृत्यू या कालव्यात वाहून गेल्याने झाला. निसरड्या पायऱ्या, बदलत जाणारा पाण्याचा प्रवाह, कालव्याच्या खोलीचा अंदाज न येणं यामुळे कण्हेर डावा कालवा एकट्या मुलांच्या खेळासाठी असुरक्षित म्हणून गणला जातो. तसेच गोडोली तळे आणि फुटके तळे यांची खोली जास्त असल्याने ‘दम’ लागण्याचा प्रकार अधिक होतो. हे लक्षात न आल्यानेही मुलांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. इथं होते पोहायला गर्दीसातारा शहरात असलेल्या फुटका तलावात दुपारी एकनंतर मुलांची पोहण्यासाठी गर्दी होते. याबरोबरच गोडोली तळ्यातही ग्रुपने जाऊन मुलं पोहण्याचा आनंद घेतात. तळ्यांबरोबरच साताऱ्यातून गेलेला कण्हेरचा डावा कालवा मुलांच्या हिटलिस्टवर आहे. तसेच शहापूर येथेही वाकळा धुवायला आलेल्यांना बरोबर असलेली मुलं पोहण्याचा मनसोक्त आंनद घेत असतानाचे चित्र दिसते. काही महाविद्यालयीन ग्रुप आपापल्या गाड्या काढून कास तलावात पोहण्याचा आनंद घेत आहे. सकाळी १० वाजता निघालेली ही पोरं संध्याकाळीच साताऱ्याकडे रवाना होताना पाहायला मिळतात.
धोका पत्करून पाण्यात मुलांच्या उड्या...!
By admin | Published: April 08, 2017 9:47 PM