कोल्हापूर : कळंबा परिसरात नव्याने इमारत बांधकामासाठी निवासी शाळेतील पाचवी ते सहावीच्या मुलांचा वापर केल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी उघडकीस आला. सांगलीतील एका विद्यार्थ्यांने मोबाइलवरून सुरू असलेला हा प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर या शाळेत अन्य पालकांनी येथे जाऊन आक्रमक पवित्रा घेत संचालकाला धारेवर धरले.घटनास्थळी पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, कळंबा परिसरातील श्री अंबाबाई मंदिर परिसरात भाडेतत्त्वावर एक निवासी शाळा आहे. या शाळेचे कळंबा रोडवरील गणपती मंदिराजवळ नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाच्या कामासाठी शाळेतील मुलांचा वापर होत असल्याचा आरोप पालकांनी केला. शाळेतील एका मुलाने गेले तीन महिने हा सुरू असलेला प्रकार पालकाला सांगितला. ते पालक तत्काळ या ठिकाणी आले. त्यांनी त्यांच्या ओळखीच्या असलेल्या पालकांना ही घटना सांगितली. या सर्वांनी त्या निवासी शाळेच्या संचालकाला जाब विचारला. घडलेल्या प्रकाराची फिर्याद पोलिसांत देणार असल्याचे सांगताच विद्यार्थ्यांकडून काम करवून घेत असल्याची कबुली देऊन त्याने वर्षभराचे घेतलेले शैक्षणिक शुल्क परत दिले. या शाळेतून विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द केला असल्याचे पालकांनी सांगतिले. सुमारे तासभर हा प्रकार सुरू होता. या निवासी शाळेत दुसरी ते दहावीपर्यंतचे सुमारे ५० विद्यार्थी आहेत. दरम्यान त्या शाळेच्या संचालकांशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.
Kolhapur: निवासी शाळेत मुलांना बनविले मजूर, पालक आक्रमक; अनेकांनी केला प्रवेश रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 15:37 IST