कुरुंदवाड : दत्तवाड (ता. शिरोळ) येथे मुलीच्या प्रेमप्रकरणाला वैतागून जन्मदात्या पित्यानेच स्वत:च्या मुलीला नदीत ढकलून खून केल्याचे उघडकीस आल्यानंतर या घटनेमुळे उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे मुलीच्या चुकीला जीव घेणे हे उत्तर नसून संयमाने बाप-मुलांमधील संवाद वाढण्याची गरज आहे. मुलींच्या अनावधानाने, पौगंडावस्थेत होणाऱ्या चुकीवर समुपदेशन झाले तरच अशा घटना पुन्हा रोखू शकतील. अन्यथा समाजाच्या खोट्या प्रतिष्ठेला घाबरून वारंवार अशा घटना घडल्यास नवल वाटू नये.
मुलगी परजातीतील तरुणाबरोबर प्रेमप्रकरण करत असून ती प्रियकरावरील प्रेम सोडण्यास तयार नसल्याने दत्तवाड येथील यंत्रमाग कामगार असलेला बाप दशरथ रामचंद्र काटकर याने स्वत:च्या साक्षी दशरथ काटकर (१७) या मुलीला दुधगंगा नदीत ढकलून खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे काही मुलीची तर काहीजण बापाची बाजू घेत आपली भूमिका मांडत आहेत. पंधरा वर्षांनंतर मुली पौगंडावस्थेत येत असतात. त्यामुळे त्यांचे मुलाकडचे आकर्षक वाढत असते. त्यातच मोबाईलवरील अश्लील चाळे, पोर्न व्हिडीओ यामुळे मुले आणि मुली तारुण्यात चुकीच्या दिशेने जात आहेत. त्यामुळे पालकांनी विशेषत: मुलींकडे अधिक लक्ष देऊन दोघांमधील संवाद वाढविणे गरजेचे आहे. मुलीची चूक झाल्यास तिचा जीव घेणे हा पर्याय नाही. त्याला सुधारण्याची संधी देणे, समुपदेशन केंद्रात नेऊन मनपरिवर्तन केल्यास नक्कीच सुधारणा होऊ शकतो. मात्र ग्रामीण भागात विशेषत: सर्वसामान्य कुटुंबातील लोक समाजातील प्रतिष्ठेला, अब्रूला घाबरत असतात. यातून असा प्रकार होत असल्याने खोट्या प्रतिष्ठेसाठी जीवघेणे प्रकार टाळणे गरजेचे आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ग्रामीण भागात पालक आणि मुलांच्यासाठी समुपदेशन केंद्राकडून समुपदेशन होणे गरजेचे आहे.
कोट : मुलगी चुकली म्हणून तिचा जीव घेणे हे उत्तर नाही. सुधारण्याची संधी दिली पाहिजे. पालक आणि मुलांमधील संवाद वाढविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी समुपदेशन केंद्र निर्माण केल्यास अशा घटनांना आळा बसू शकेल.
- बाबासाहेब नदाफ, हेरवाड राष्ट्र सेवादल महामंत्री