केव्हढ्या मोठ्या जुड्या बांधतात नै? कॉलनीत सगळ्या वहिन्यांची अश्शी फोनाफोनी होत होती. प्रॉब्लेम असा होता. की सगळ्यांच्या घरकामाला बाया होत्या. पण त्या शिळं अजिबात खायच्या नाहीत. फ्रीज मधलं त्याना चालायचं नाही. टीव्हीवरचं ऐकून, बघून त्यांचं लोकशिक्षण झालं होतं. लोकांनी दिलेलं स्वच्छ असेलच असं नाही, स्वतःच्या हातानी केलेलं ,आपल्या डोळ्यासमोर रांधलेलंच खायचं. वहिन्या आपल्या कामवाल्या बायांना प्रेमाने सांगायच्या, "आम्ही जे खातो तेच तुला देतो. फ्रीजमध्ये ठेवलेलं आम्ही घरातली सगळी खातोच की.ते चांगलंच असतं पण जास्त झालं तर खराब होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवावं लागतं ग. नीट समजून घे.’.सुलभाताईंच्या बाईने तर कमालच केली. होळीला त्यांनी दरवर्षीप्रमाणे पुरणपोळ्या केल्या . दोन पोळ्या, कटाची आमटी, मसालेभात, सांडगे पापड असं ताट वाढलं नि त्या बाईला म्हणाल्या, ‘सोनाबाई, इथे जेवता की घरी नेता?’तर सोनाबाई म्हणाल्या,‘आव वैनी, मीबी आज शेम अस्साच समदा सैपाक केलाया. किलोचं पुरण घातलंय.’
‘निम्म्या अर्ध्या पोळ्या करून आले उरलेल्या जाऊन करणार. ताट ठेवा. ह्ये आनि कवा न्हेऊ?’ सुलभाताईनी हसण्यावारी न्हेल.‘.बरं, उद्या तुझ्या कडचं ताट वाढून मला आण. मला तेव्हढाच रुचिपालट.’
सरलाभाभीनी आज ठरवलच, कॉलनीतल्या सगळ्या स्त्रियांची ही समस्या पुरुषांपर्यत पोचवायचीच. कॉलनीतल्या बायकांमध्ये बराच एकोपा होता पण पुरुषांमध्ये तितका नव्हता. तिथे प्रत्येकजण आपला ईगो महत्त्वाचा मानत होता. त्यांच्या पोस्टची लेवल म्हणजे दर्जा त्यांना महत्त्वाचा वाटत होता. सरलाभाभींचे मिस्टर असि. प्रोफेसर ह्या लेवलचे होते. ते सिव्हिल इंजिनिअर होते. त्यांनी आपल्या डिपार्टमेंटच्या काही मंडळीना कॉल करून बोलावलं. सगळ्यांना वाटलं, बांधकामाच्या एखाद्या प्रोजेक्टसाठी जमायचं असावं. प्रत्यक्षात समस्या गृहिणींची निघाली. ‘त्यांनी विषय मांडला. हल्ली मोलकरणी शिळंपाकं नेत नाहीत, खात नाहीत, रस्त्यावर पूर्वीसारखे अन्नाला मोताद असे भिकारी दिसत नाहीत, तर त्या उरलेल्या अन्नाचं काय करायचं? फ्रीजमधलं स्वतः खाऊन सगळ्यांची वजनं वाढताहेत. तर ह्याला उपाय सुचवा. ‘अहो, रस्त्यावर भिकारी नाहीत, पण भटकी कुत्री तर आहेत, त्यांना घाला म्हणावं.’ हा उपाय सुचवून मि.इनामदार उठले. सरलाभाभीनी आपल्या काही मैत्रिणींना सभेला बोलावलं होतंच. त्यातल्या शीलाताई उठल्याच .म्हणाल्या, ‘अहो, आपण मागच्या सोमवारीच नगरपालिकेकडे तक्रार अर्ज केलाय. भटक्या कुत्र्यांना पकडून न्या म्हणून. आणि आम्हीच त्यांना खायला घातलं तर पलिकडच्या गल्लीतून आणखी येतील.’
‘इनामदार, बसा, समस्येवर विचार करुया. अजून संपलं नाही.’
‘मला वाटतयं. उरलेलं अन्न सरळ झाडांना घातलं तर? ती बिचारी नको म्हणणार नाहीत. खत दिल्यासारखंच की.’
‘आमच्या कुंड्यांमध्ये घालत होते बाई. मुंग्या येतात. खत कुठलं? विष होतंय. बाल्कनीत कावळे पण येतात.’
‘आपल्या कुंड्यात नका घालू, बंगलेवाल्यांच्या बागेत मोठी झाडं आहेत .त्यांच्या मुळात घालून यायचं,हळुच.’
‘हूँम् .माळी असतोय तिथे हजर. गेल्यावर्षी मी आमच्या मोलकरणीला ते काम दिलं होतं,पैसे देऊन. तर प्राचार्यांच्या मिसेस किती खवळल्या. असं अन्न घालून म्हणे त्यांच्या कलमी आंब्याला वाळवी लागली. किती औषधं करावी लागली. पार रत्नागिरीहून माणूस आणला होता झाडावर उपचार करण्यासाठी.’
‘गांडूळ खत करू शकतो आपण. ती सगळं खातात म्हणे.’ मि. आराणकेनी अगदी निर्वाणीसारखं सांगितलं.
‘ती आणि उसाभर कोणी करायची? आपल्या चार कुंड्या. तयार गांडुळखत आणलं की आपलं भागतं.’
‘आता अगदी मूलभूत उपाय मी सांगतलय् ’. मालवणच्या वाडेकरांना मधूनच मालवणी बोलायची सुरसुरी यायची.‘हं सांगा.’ सगळी म्हणाली. वाडेकरनी मूळ मुद्यालाच हात घातला. ते म्हणाले, ‘त्या-अमुक एका कार्डधारकांना ----थोडं थोडकं नाही, पंधरा-वीस किलो तांदूळ, पाच किलो डाळ, पाच किलो हरभरे,एव्हढं धान्य, नि ते सुद्धा मोफत मिळतं. हे द्यायला कोणी सुरुवात केली? अर्थात मोदींनी. त्यांना पत्र पाठवूया.‘तुमच्या ह्या योजनेमुळे लोकांना अन्नाची किंमत वाटेनाशी झाली आहे, कितीतरी दुकानदार वरकामाला माणसं मिळत नाहीत म्हणून टेकीला आलेत. लोकं इतकी आळशी झालीयत् कामाला बोलावलं तर येत नाहीत. बसून खायला मिळतंय. कोण कशाला काम करील! ह्याही पुढची एक आश्चर्यकारक गोष्ट ऐका. असं धान्य मिळणाऱ्या काही बायका ते फुकट मिळणारे तांदूळ घरात भातासाठी वापरत नाहीत. डाळी, हरभरे आमटी, उसळीसाठी खर्च करीत नाहीत.