कोल्हापूर : मी दोन-चार घरांतील भांडी घासून, तर मी भंगार गोळा करून शाळेला जाते. आम्हांला भविष्यात शिक्षक व्हायचे आहे, असे शाहूवाडीतील भारती गोसावी आणि शिवानी गोसावी यांनी सांगितले. शिक्षण घेण्याबाबतच्या त्यांच्या कष्ट, जिद्दीला बुधवारी अन्य विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात सलाम केला.
घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने काहीकाळ शाळाबाह्य राहिलेली मुले-मुली शिक्षणाच्या प्रवाहात पुन्हा आली आहेत, अशा काही मुला-मुलींनी बुधवारी बालदिनानिमित्त ‘लोकमत’च्या कार्यालयात मुक्तपणे संवाद साधत आपले ध्येय, हक्क आणि कर्तव्यांबाबत मते मांडली.शाळाबाह्य मुला-मुलींना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम सांगरूळ (ता. करवीर) येथील उमेद शिक्षण केंद्र आणि शाहूवाडीतील ज्ञानसेतू प्रकल्पामार्फत केले जात आहे. या केंद्रांच्या माध्यमातून शाहूवाडी, सांगरूळ, पासार्डे, कुडित्रे या परिसरातील मुले-मुलींसमवेत संवाद साधण्याचा उपक्रम ‘लोकमत’ने बालदिनानिमित्त घेतला.‘लोकमत’च्या शहर कार्यालयातील या कार्यक्रमात विविध प्रश्नांना उत्तरे देत उपस्थित विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यात शाहूवाडीतील भारती गोसावी हिने पहाटे पाच वाजता उठून भंगार गोळा करते. त्यानंतर घरातील कामे करून शाळेला जात असल्याचे सांगितले. तिच्याच समवेत आलेल्या शिवानी हिने सकाळी दोन-चार घरांमध्ये भांडी घासण्याचे काम करून शाळेला जातो. सायंकाळी आम्ही अभ्यास पूर्ण करतो. आम्हा दोघींना आयुष्यात शिक्षक म्हणून काम करायचे आहे, असे सांगताच उपस्थितांनी शिक्षणाबाबतच्या त्यांच्या जिद्दीला टाळ्यांच्या गजरात सलाम केला.
त्यानंतर शिक्षण आमचा हक्क आहे; त्यामुळे गुणवत्तापूर्ण, दर्जेदार आणि आनंददायी शिक्षण आम्हाला मिळाले पाहिजे, असे उपस्थित सर्व मुलांनी सांगितले. कोणी शिक्षक, कोणी डॉक्टर, तर कोणी पोलीस निरीक्षक, सैन्यदलातील अधिकारी, आयएएस आॅफिसर, ऐरोनॉटिकल आॅफिसर, वैद्यकीय अधिकारी होण्याचे ध्येय सांगितले.या कार्यक्रमात ‘उमेद’ केंद्राचे प्रकाश गाताडे, आभास फौंडेशनचे अध्यक्ष अतुल देसाई यांनी विद्यार्थ्यांना बालहक्क आणि कर्तव्यांबाबत मार्गदर्शन केले. ‘लोकमत’ चे मुख्य बातमीदार विश्र्वास पाटील यांनी वर्तमानपत्रांची कार्यपद्धती, पत्रकारांचे दैनंदिन काम याबाबतची माहिती दिली. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल मेधप्रणव याचा ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांच्या हस्ते ‘दीपोत्सव’ देऊन सत्कार करण्यात आला. ‘लोकमत’चे उपवृत्तसंपादक चंद्रकांत कित्तुरे, ‘उमेद’ केंद्राचे सचिन कुंभार, सुनील गोसावी, राजेंद्र चव्हाण, राजाराम कांबळे, आदी उपस्थित होते.
या विद्यार्थ्यांनी साधला संवादसिद्धी लोहार, प्राजक्ता हरणे, सानिका जाधव, प्रणव पाटील (कुडित्रे), भारती आणि शिवानी गोसावी, सुमित गोसावी (शाहूवाडी), राजआर्यन गोसावी (येळाणे), राजवर्धन गाताडे, प्रज्योत नाळे, श्रेयश नाळे, राजवर्धन सणगर, विवेक बोळावे (सांगरूळ), ओंकार कांबळे, आशिष कांबळे (पासार्डे).
लघुपट पाहून विद्यार्थी भावूकया कार्यक्रमात लघुपट दिग्दर्शक मेधप्रणव बाबासाहेब सरस्वती यांनी ‘एफटीटीआय’ मार्फत बनविलेल्या ‘हॅप्पी बर्थडे’ हा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त लघुपट दाखविला. बाबा आणि मुलगा यांचे भावविश्व उलघडणारा लघुपट पाहून उपस्थित विद्यार्थी भावूक झाले.