गडहिंग्लज : गडहिंग्लज बाजार समिती आवारात मिरची आवक सुरू झाली आहे. चालूवर्षी संकेश्वरी (जवारी) मिरचीबरोबरच ब्याडगी मिरचीनेही दरात मुसंडी मारली आहे. संकेश्वरी मिरचीचा दर सद्या ५०० पासून १२०० रूपये प्रतिकिलो सुरू आहे. मात्र, यंदा हंगामाच्या सुरूवातीलाच ब्याडगीने ३८० ते ४३२ रूपये प्रतिकिलो दर गाठला आहे. गेल्या ३० वर्षात ब्याडगी मिरचीने प्रथमच उच्चांकी दर गाठला आहे.मान्सूनची दमदार सुरूवात आणि परतीच्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे हुकमी पिक मिरची शेतातच गारठल्याने यंदा मिरचीचा दरही भडकणार आहे. त्यामुळे कांद्यापाठोपाठ मिरचीनेही ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणण्यास सुरूवात केली आहे.सध्या बाजारात आवक झालेल्या मिरच्या व दर प्रतिक्विंटल कंसात - काश्मीर ब्याडगी मिरची ( नं. १ - ३८००० ते ४३२००, नं. २ - ३३००० ते ३८०००), ब्याडगी मिरची (नं. १ - ३०००० ते ३६५००, नं.२ -२६००० ते २८५००), सिजंटा ब्याडगी ( नं.१- २७००० ते ३१५००, नं.२ - २०००० ते २२५००), गरूडा तिखट मिरची - (१३५०० ते १६५००), लाली ब्याडगी (१६००० ते १९०००), पांढरी मिरची ( १५०० ते २५००), ब्याडगी मध्यम (१२००० ते १६०००)ग्राहक वेट अॅण्ड वॉचमध्ये जवारीसह ब्याडगी, गरूडा, सिजंटा, पांढरी मिरची, लाली ब्याडगी यांचाही दर यंदा जवळपास १५० पासून पुढे असल्याने ग्राहक केवळ विचारपूस करून माघारी परतत आहेत. मात्र, यंदा व्यापाऱ्यांकडेही अल्पप्रमाणात आवक होत असल्याने आलेला माल मुंबई, पुणेसह अन्य राज्यात निर्यात केला जात आहे. त्यामुळे वेट अॅण्ड वॉचमध्ये असलेल्या स्थानिक नागरिकांना मिरचीसाठी गतवर्षीप्रमाणे आणखी कांही दिवसानंतर यापेक्षाही अधिक दर मोजावे लागण्याची शक्यता आहे.