सरदार चौगुले -पोर्ले तर्फ ठाणे -दिवस मावळतीला लागला की, हळूहळू पैशांच्या डावाने खेळणाऱ्या मंडळींचा घोळका जमतो अन् खेळात फेकलेल्या चिल्लरचा आवाज कानांवर आपटतो. खेळाचा गोंगाट ऐकून परिसरातील चिल्लर पार्टी आणि बघे खेळातील आधिलीचा अचूक अंदाज टिपणाऱ्या वट्ट्याकडे टक लावून पाहतात. पन्हाळा पोलिसांनी एकदा छापा टाकून ‘पैशाचा डाव बंद करा’ असा दमही दिला होता; परंतु खाकी आदेशाला डावलून खुलेआम पैशाचा डाव खेळला जात आहे. वर्दळ नसणाऱ्या हमरस्त्यात खेळल्या जाणाऱ्या डावामुळे शेताकडे जाणाऱ्या महिलांना याचा त्रास होत आहे, अशी महिलावर्गांतून प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.पन्हाळा तालुक्यातील विकसनशील असलेल्या पोर्ले तर्फ ठाणे गावातील कुंभारवाड्या- नजीकच्या गावविहिरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर खुलेआम पैशाचा डाव खेळला जातो. रोज सायंकाळी गेल्या तीन महिन्यांपासून पैशांच्या वट्ट्यांचा खेळ खेळला जातो. मनोरंजनाचे पारंपरिक खेळ नामशेष होत असताना वट्ट्यापासून पैशांचा खेळला जाणारा जुना डाव याठिकाणी नव्याने बाळसं धरू लागला आहे. गावातील कुंभार वस्ती लगतच्या रस्त्यावर हा अवैध खेळ पाहण्यासाठी खेळाच्या सभोवती चिल्लर पार्टीचा गराडा जमलेला असतो. खेळात मोकळीकता असल्याने आधिली टिपण्यासाठी, सांगण्यासाठी दंगा आणि गोंधळ होत असल्याने महिलांना याचा त्रास होतो. पन्हाळा पोलिसांनी या अवैध खेळाला वेळीच वेसण घालावी, अन्यथा खेळणाऱ्यांच्या संख्येबरोबर डावांचीही संख्या वाढत राहील.मोठी उलाढालसुरुवातीला दोघा-तिघांचा असणारा डाव आता १०-१२ जण खेळत आहेत. एका रुपयाला दहा रुपये, दोनला वीस, तर पाच रुपयांना पन्नास रुपयांचे प्रमाण ठरवून चिल्लरने डाव खेळला जातो.प्रत्येक डाव बल्ल्यासह १५० ते २०० रुपयांत रंगतो, असे २० ते २५ डाव दररोज खेळले जातात. दिवसभरात डावात हजारो रुपयांची उलाढाल होते.
चिल्लर पार्टीच्या समोरच रंगतोय ‘चिल्लर’चा डाव
By admin | Published: October 27, 2014 11:56 PM