कोल्हापूर : गावी जाण्यासाठी केवळ सात रुपयांची गरज असताना, सापडलेली चाळीस हजार रुपयांची रक्कम प्रामाणिकपणे परत करणाऱ्या धनाजी जगदाळे यांचा चिल्लर पार्टीने केलेल्या सत्काराने माणुसकी भारावून गेली.चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीमार्फत रविवारी शाहू स्मारक येथील कार्यक्रमात अभिनेते सागर तळाशीकर यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील पिंगळी बुद्रुक या गावातील धनाजी जगदाळे या शेतमजुराचा रोख रक्कम, पेहराव आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. प्रारंभी मुलांसाठी ‘डम्बो’ हा सिनेमा दाखविण्यात आला.यावेळी सागर तळाशीकर म्हणाले, अशा धनाने नाही तर मनाने श्रीमंत असलेल्या माणसांमुळेच समाज जिवंत आहे. माणसाला मोहापासून सुटका करून घेणे अवघड असते; पण धनाजी जगदाळेंसारख्या माणसांमुळेच समाज घडत असतो. त्यांचा हा प्रामाणिकपणाच मुलांसाठी आदर्श ठरेल.माझ्यासारख्याच गरीब माणसाची मी केवळ मदत केली, अशी भावना यावेळी धनाजी जगदाळे यांनी व्यक्त केली. मुलांनी प्रामाणिकपणा जपावा, असे आवाहन करून त्यांनी या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी पिंगुळी गावचे सूर्यकांत जगदाळे, संभाजी कोकरे, महेंद सजगणे, किसन जाधव, सायबर कॉलेजचे प्राध्यापक डॉ. दीपक भोसले, आदी उपस्थित होते.या कार्यक्रमात चिल्लर पार्टीच्या वतीने सागर तळाशीकर, पिंगुळी गावचे प्रा. राजेंद्र जगदाळे यांना सिनेमा पोरांचा हे पुस्तक भेट देण्यात आले. यावेळी चिल्लर पार्टीचे अतुल मजेठिया, राजू नाईक, गुलाबराव देशमुख, अभय बकरे, रवींद्र शिंदे, निलोफर महालकरी, घन:शाम शिंदे, रोहित कांबळे उपस्थित होते.